
बाभुळगाव येथील सोन्या-चांदीच्या दुकानातील चोरीचा छडा लावत बाभुळगाव पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले ३५४ ग्रॅम सोन्याचे दागिने, किंमत १७ लाख ७० हजार रुपये, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते तक्रारदार जितेंद्र तातेड यांना परत करण्यात आले.
दुकान बंद करून गेलेल्या जितेंद्र तातेड यांना २७ जुलै रोजी दुकानाचे कुलूप तुटलेले आढळले. दुकानाची पाहणी केली असता सोन्याचे विविध दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी बाभुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून मिळालेल्या बोटांच्या ठशांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. बोटांच्या ठशांवरून आरोपींचा शोध घेत पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. त्यानंतर आरोपींच्या मोबाईलच्या आधारे त्यांचे अचूक ठिकाण शोधून काढण्यात आले.
पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर असतानाच अजय मोहन काळे ऊर्फ पारधी (२६), विनोद वानसोब पवार (४६) आणि मंगलसिंग ऊर्फ बबलू सुरेश पारधी (१९) यांना ताब्यात घेण्यात आले. यातील दोन आरोपी मध्य प्रदेशातील आहेत. चोरी केल्यानंतर आपल्या गावी परतण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
आरोपींकडून चोरीतील ३५४ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत १७ लाख ७० हजार रुपये आहे. जप्त केलेले सोन्याचे दागिने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते तक्रारदार जितेंद्र तातेड यांना परत करण्यात आले.
पोलीस पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बाभुळगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे, सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलीस उपनिरीक्षक विक्की जाधव, दीपक आसकर तसेच पोलीस अंमलदार धर्मराज घायवाटे, मंगेश कळसकर, निलेश भुसे, सूरज गजभिये, विजय लोखंडे व सुदर्शन अघाव यांच्या पथकाने ही कारवाई केली.





























































