
मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चार जणांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर मारहाणीच्या वेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या पाचव्या आरोपी साधना कारंडे हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रियांका उधमाळेची आई साधना कारंडे हिला शनिवारी रात्री तिच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. डॉक्टर मारहाण प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती स्पष्टपणे दिसत असल्याने तिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी तिला चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, तिच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे अटकेची कारवाई पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत साधना कारंडे हिला अटक केली.

























































