केवळ फेस वॉश पुरेसा नाही! घरातील 5 नैसर्गिक स्क्रबने मिळवा चमकदार आणि निरोगी त्वचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

पावसाळ्यातील दमट हवामान, सततचा घाम आणि प्रदूषणामुळे त्वचेची छिद्रे (पोर्स) बंद होतात. त्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो आणि केवळ फेस वॉश वापरून त्वचा पूर्णपणे स्वच्छ होत नाही. अशा वेळी आठवड्यातून एक-दोन वेळा नैसर्गिक स्क्रबचा वापर केल्यास त्वचेवरील मृत पेशी दूर होऊन चेहऱ्याची नैसर्गिक चमक परत मिळण्यास मदत होऊ शकते. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांपासून प्रभावी स्क्रब तयार करता येतात.

स्क्रबिंग म्हणजे त्वचेचे एक्सफोलिएशन. यामुळे त्वचेवरील मृत पेशी दूर होतात, अतिरिक्त तेलाचे प्रमाण नियंत्रित राहते आणि त्वचा अधिक स्वच्छ, मऊ व तजेलदार दिसते. काही नैसर्गिक घटकांतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांची समस्या कमी करण्यासही मदत करतात.

घरच्या घरी बनवा हे 5 स्क्रब

कॉफी आणि नारळाचे तेल
अर्धा चमचा कॉफीमध्ये दोन चमचे नारळाचे तेल मिसळून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. हा स्क्रब त्वचा स्वच्छ करण्यासोबतच मॉइश्चरायझरचेही काम करतो.

कडुलिंबाचा रस, मध आणि कॉफी
तेलकट व मुरुमांची समस्या असलेल्या त्वचेसाठी हा उत्तम पर्याय आहे. कडुलिंबाचा रस, मध आणि थोडी कॉफी मिसळून तयार केलेला स्क्रब त्वचेवरील जंतू कमी करण्यास मदत करतो.

ओट्स आणि दही
एक चमचा ओट्स पावडरमध्ये दही मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे डेड स्किन निघून त्वचा मऊ आणि तजेलदार राहते.

तांदळाचे पीठ आणि अ‍ॅलोव्हेरा जेल
एक चमचा तांदळाच्या पिठात दोन चमचे अ‍ॅलोव्हेरा जेल मिसळा. त्यात गुलाबपाणी घातल्यास अधिक फायदा होऊ शकतो. तेलकट त्वचेसाठी हा उत्तम पर्याय मानला जातो.

मसूर डाळ आणि दूध
भिजवलेली मसूर डाळ जाडसर वाटून त्यात दूध मिसळा. या मिश्रणाने हलक्या हाताने स्क्रब केल्यास त्वचा स्वच्छ होण्याबरोबरच टॅनिंगही कमी होण्यास मदत मिळते.