सुवर्णनगरीत चांदी सात हजारांनी घसरली, सोनेही झाले स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जळगाव सुवर्णनगरीतील सराफ बाजारात सोने-चांदीच्या दरातील चढ-उतार कायम असून अवघ्या एका दिवसाच्या भाववाढीनंतर दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती पुन्हा घसरल्या. विशेष म्हणजे, चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली असून एका दिवसातच चांदी 7 हजारांनी स्वस्त झाली आहे. त्याच वेळी सोन्याच्या दरातही
600 रुपयांची घट झाली आहे.

गेल्या आठवडाभरापासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू होती. त्यानंतर गुरुवारी (16 जुलै) चांदीच्या दरात 3 हजारांची वाढ होऊन प्रतिकिलो दर 2 लाख 26 हजारांवर पोहोचला होता. मात्र, ही तेजी केवळ एक दिवसच टिकली. सराफ बाजारात चांदीच्या दरात थेट 7 हजारांची घसरण झाल्याने प्रतिकिलो दर 2 लाख 19 हजारावर आला. तसेच सोन्याच्या दरातही 600 ची घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या सोन्याचा दर प्रति तोळा 1,41,600 रुपयांवर आला आहे.

डॉलर व जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम स्थानिक सराफ बाजारावर होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.