इराणच्या हल्ल्यात 2 अमेरिकन सैनिक ठार; जॉर्डनमधील लष्करी तळाला केले लक्ष्य, पाणी प्रकल्पावरील हल्ल्याला प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणने जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळावर भीषण हल्ला केला. त्यात दोन अमेरिकन सैनिक ठार झाले असून चार सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेने या माहितीला दुजोरा दिला आहे. इराणच्या थेट हल्ल्यात प्रथमच अमेरिकेच्या सैनिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेने इराणच्या समुद्राचे खारे पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य बनविणाऱ्या केंद्रांवर हल्ले केले. यामुळे 20 गावांमधील 10 हजार लोकांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे, तर प्रत्युत्तर म्हणून इराणने कुवैतच्या डिसॅलिनेशन केंद्रावर हल्ला केला. त्यानंतर जॉर्डनमध्ये निशाणा साधला. युद्धबंदी मोडल्यानंतर इराणने आता महिनाभरापूर्व झालेल्या शांतता करारापासून मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इराण युद्ध आणखी भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.

इराणने जॉर्डनमधील तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने भीषण हल्ला केला. त्यावेळी अमेरिकेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले, मात्र अमेरिकेचे दोन सैनिक ठार झाले. एक सैनिक बेपत्ता आहे. या सैनिकांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. तत्पूर्वी, अमेरिकेने इराणच्या होर्मोजगान प्रांतात हवाई हल्ला करून बोंजी डिसॅनिलेशन केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त केले. यामुळे 10 हजार नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. या हल्ल्यांना इराणने दहशतवाद म्हटले आहे. इराणने या हल्ल्याचे प्रत्युत्तर देताना कुवैतच्या डिसॅलिनेशन केंद्रावर हल्ला केला.

कुवैत, बहरिनमधील तळांवर हल्ले

इराणने कुवैत येथील अल-अहमदी बंदरावर हल्ला केला. त्यात अमेरिकन नौदलाला इंधन पुरवणाऱया यंत्रणेला लक्ष्य करण्यात आले. याशिवाय बहरिन येथील शेख ईसा हवाई तळावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. याशिवाय बहरिनमधील अमेरिकेचे गुप्त डेटा सेंटरदेखील इराणने उद्ध्वस्त केले.

अमेरिकेची मोठ्या हल्ल्याची तयारी

अमेरिकेने इराणवर मोठय़ा हल्ल्याची तयारी केली आहे. अमेरिकेने इस्रायलमध्ये तब्बल 60 रिफ्युअलिंग विमाने तैनात केली आहेत. त्यापैकी 30 ही बेन गुरियन या विमानतळावर सज्ज आहेत. अमेरिका आता आणखी डझनभर विमाने इस्रायलमध्ये पाठवत आहे. लांब पल्ल्याची लढाऊ आणि बॉम्बर विमाने त्यात समाविष्ट आहेत. इराणची वीज निर्मिती केंद्र, आण्विक तळे अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत.