
नवी मुंबईतील इंदिरा नगर येथे भंगार व्यावसायिकाला दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाची उपजिल्हा संघटक पूजा बनसोडे हिला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. तिने आपल्या चार सहकाऱ्यांच्या मदतीने या व्यावसायिकाला आणि त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला मारहाण केली होती.
सर्वेंद्रकुमार ठाकूर यांचे इंदिरा नगरमध्ये भंगाराचे दुकान आहे. या परिसरात दुकान चालवायचे असले तर दोन लाख रुपयांची खंडणी द्यावी लागले, अशी धमकी शिंदे गटाची उपजिल्हा संघटक पूजा बनसोडे हिने दिली होती. तसेच रमजान शेख, सरिता सरवदे, नरेंद्र साकवार, हुसेन शेख यांना बरोबर घेऊन ठाकूर यांच्या दुकानात जाऊन त्यांच्यासह दुकानात काम करणाऱ्या कामगाराला मारहाणही केली होती. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पूजाला अटक केली आहे. पूजाचे अन्य साथीदार फरारी झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हाचा पुढील तपास करीत आहेत.



























































