
मुदत संपलेली मॅगी नुडल्स विकल्याने ‘विशाल मेगा मार्ट’या कंपनीला ग्राहक न्यायालयाने 2.8 लाखांचा दंड ठोठावला आहे. आंध्र प्रदेश राज्यातील कर्नूल येथील रहिवासी पी. श्रावण पुमार यांनी 20 मार्च 2025 रोजी जवळील ‘विशाल मेगा मार्ट’मधून मॅगी आटा नूडल्सची दोन पाकिटे खरेदी केली होती. त्याच रात्री त्यांनी ते नूडल्स खाल्ले. मात्र, काही वेळातच त्यांना ताप, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना विषबाधा झाल्याचे निदान केले.
रुग्णालयातून घरी आल्यानंतर जेव्हा त्यांनी मॅगीचे दुसरे पाकीट तपासले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. मुदत संपून दोन दिवस उलटल्यानंतरही या मॉलने हे पाकीट ग्राहकाला विकले होते. श्रावण कुमार यांनी 15 डिसेंबर 2025 रोजी मॉलला कायदेशीर नोटीस पाठवली. मात्र, मॉल प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर पीडित ग्राहकाने ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. ग्राहक आयोगाने या प्रकरणात मॉलला 2.5 लाख रुपये आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीत जमा करण्याचे आदेश दिले. तसेच तक्रारदार ग्राहकाला 25,000 रुपयांची भरपाई आणि विषबाधेमुळे झालेल्या शारीरिक यातना आणि मानसिक त्रासाबद्दल 25,000 रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिला आहे.


























































