विवस्त्र होऊन मंदिरात धावत गेली, देवीची मूर्ती घेऊन तलावात उडी घेतली; IT इंजिनिअर तरुणीचा गूढ मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबादमधील एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ वळण मिळाले आहे. एका स्थानिक मंदिरात विवस्त्र होऊन प्रवेश केल्यानंतर देवीची मूर्ती सोबत घेऊन तलावात उडी मारल्याने या तरुणीचा बुडून मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आता तलावातून गायब झालेल्या देवीच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

तेजस्विनी असे मृत महिला तरुणीचे नाव असून ती आयटी क्षेत्रात काम करत होती. तेजस्विनीने घटनेच्या वेळी अंगावरील सर्व कपडे काढले आणि ती विवस्त्र अवस्थेत जवळच असलेल्या एका मंदिरात दाखल झाली. तिथे तिने गाभाऱ्यातील अम्मारु देवीची मूर्ती उचलली आणि ती सोबत घेऊन जवळच असलेल्या तलावाकडे गेली. त्यानंतर मूर्तीसह तिने तलावाच्या पाण्यात उडी घेतली. काही वेळातच तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी तिचा मृतदेह तलावाबाहेर काढला असला, तरी देवीची मूर्ती मात्र अजूनही बेपत्ता आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात ती मूर्ती अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानली जात आहे. त्यामुळे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून, बोटींच्या साहाय्याने संपूर्ण तलावात मूर्तीचा शोध घेतला जात आहे.

महिन्याला 1 लाख रुपये भाडे

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी सुरू केला आहे. तपासादरम्यान तेजस्विनी राहत असलेल्या फ्लॅटबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती ज्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती, तिथे ती दररोज सुमारे 3500 रुपये म्हणजेच महिन्याला तब्बल 1 लाख रुपयांच्या आसपास भाडे देत होती. विशेष म्हणजे, या इमारतीचे वरचे दोन मजले एका लॉजसारखे बेकायदेशीरपणे चालवले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या लॉज कनेक्शनचा आणि तेजस्विनीच्या मृत्यूचा काही संबंध आहे का या दृष्टीनेही पोलीस कसून चौकशी करत आहेत.

वाढदिवशी पत्नीला सरप्राईज द्यायला आला अन् जीवाला मुकला; घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बालेश्वरमध्ये खळबळ

आत्महत्येचा संशय; पोलीस तपास सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे. तेजस्विनीच्या आई अरुणा यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. तसेच, तेजस्विनीने मृत्यूपूर्वी लिहिलेली कथित चिठ्ठी तिच्या बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहार आणि घटनेच्या काही दिवस आधी ती कोणाकोणाला भेटली, या सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. तेजस्विनीने हे टोकाचे पाऊल का उचलले आणि त्या रात्री नक्की काय घडले, याचा अचूक घटनाक्रम अद्याप स्पष्ट झालेला नाही. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि फॉरेन्सिक पुराव्यांचे विश्लेषण करत आहोत. तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने अद्याप कोणत्याही अंतिम निष्कर्षावर पोहोचता आलेले नाही, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.