वाढदिवशी पत्नीला सरप्राईज द्यायला आला अन् जीवाला मुकला; घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बालेश्वरमध्ये खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पत्नीला वाढदिवसाचे सरप्राईज देण्यासाठी घरी परतलेल्या एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ओडिशामधील बालेश्वर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी थेट पत्नी आणि तिच्या कथित प्रियकरावर हत्येचा आरोप केला आहे. सहदेवखुंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. ‘इंडिया टीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

मृत तरुण हा ओडिशामधील जगतसिंगपूर जिल्ह्याचा रहिवासी होता. आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि तिला सरप्राईज देण्यासाठी तो घरी आला होता. मात्र, घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच त्याचा घरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

माझ्या भावाचा खून झाला!

या प्रकरणात मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराने मिळून ही हत्या केल्याचा आरोप केला आहे. काल माझ्या वहिनीचा वाढदिवस होता. माझा भाऊ तिला शुभेच्छा देण्यासाठी आणि सरप्राईज देण्यासाठी घरी गेला होता. परंतु, त्यानंतर काही वेळातच मला वहिनीच्या भावाचा फोन आला आणि माझ्या भावाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले. आम्हाला या मृत्यूवर पूर्ण संशय असून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप मृतकाचा भाऊ पवित्र कुमार सेठी याने केला आहे.

पोलीस म्हणतात…

दरम्यान, कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांकडे निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. मृतकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहदेवखुंटा पोलीस ठाण्याचे प्रभारी आलोक कुमार बेहरा यांनी दिली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालाची प्रतीक्षा आहे. कुटुंबीयांनी पत्नीवर हत्येचे आरोप केले असले तरी मृत्यूचे अचूक कारण शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. पोलीस सध्या आत्महत्या की हत्या या दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.

सर्पदंशामुळे नव्हे पूर्वनियोजित हत्या, मेरठमधील मुख्याध्यापकाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती उघड

तपास सुरू, अटकेची कारवाई अद्याप नाही

या प्रकरणातील मुख्य संशयित असणारी मृतकाची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराबाबतच्या आरोपांची पोलीस सध्या शहानिशा करत आहेत. फॉरेन्सिक पुरावे आणि शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.

प्रेमात वेडा झाला, नकार मिळताच अंगात सैतान संचारला; तरुणीला बसस्टॉपवर गाठत सपासप वार केले, थरारक Video व्हायरल