
डॉक्टरांना मारहाण करणारा शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीन स्थगित करत त्याला उद्या, रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यत पोलिसांना शरण येण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले आहे. तसेच आता सरकारने सुप्रीम कोर्टात जाऊन रमेश म्हात्रे हा स्वातंत्र्य सैनिक आहे, म्हणून त्याला जामीन द्यावा, असा अर्ज करू नये म्हणजे झालं असा टोलाही लगावला आहे.
एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून अवघ्या चार दिवसांत जामीनावर सुटलेल्या गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीन माननीय उच्च न्यायालयाने स्वतःहून रद्द केल्याची बातमी सत्तेला झटका देणारी आणि सामान्य माणसाला दिलासा देणारी आहे. खोटे गुन्हे दाखल करून सरकार आपल्या विरोधकांना अनेक दिवस तुरुंगात डांबतं आणि सत्तेच्या आश्रयाखाली गेलेल्या गुंडांना मात्र मोकाट सोडतं, यातून समाजात अत्यंत चुकीचा संदेश जातो. पण मा. न्यायालयाने स्वतःहून आपलं अस्तीत्व दाखवून देत वादळातही काही दिव्यांची ज्योत मिनमिणती का असेना पण आपलं स्वतंत्र अस्तीत्व टिकवून आहे, हे दाखवून दिलं. याबाबत मा. न्यायालयाचे मनापासून आभार!
तसेच आता सरकारने सुप्रीम कोर्टात जाऊन रमेश म्हात्रे हा स्वातंत्र्य सैनिक आहे, म्हणून त्याला जामीन द्यावा, असा अर्ज करू नये म्हणजे झालं, असेही रोहित पवार म्हणाले.
सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून अवघ्या चार दिवसांत जामीनावर सुटलेल्या गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेचा जामीन मा. उच्च न्यायालयाने स्वतःहून रद्द केल्याची बातमी सत्तेला झटका देणारी आणि सामान्य माणसाला दिलासा देणारी आहे. खोटे गुन्हे दाखल करून सरकार आपल्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 19, 2026

























































