मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खानपान सेवेला महागाईचा तडका; 4 वर्षांसाठी 39 कोटी 40 लाखांचे कंत्राट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती युध्दाची झळ सर्वसामान्यांना बसली असताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पुरवण्यात येणाऱ्या खानपान सेवेलाही बसला आहे. या बंगल्यांवर पुरवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे दरही मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. पण त्याचा आर्थिक भाग शासकीय तिजोरीवर पडणार आहे. या बंगल्यावरील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि पाहुण्यांना चिकन-मटण बिर्याणीपासून उकडीचे मोदक पुरवण्यासाठी पुढील चार वर्षांसाठी तब्बल 39 कोटी 40 लाख रुपये खर्च होणार आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी खानपान सेवा त्यातील सुखसागर हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस या सेवा पुरवठादाराची निवड झाली. या तिन्ही बंगल्यांना सेवा पुरवण्याचे प्रत्येक वर्षाचे 9 कोटी 85 लाख रुपयांचे असे पुढील चार वर्षांचे कंत्राट सुखसागरला दिले आहे. मात्र मागील वर्षी हाच कंत्राटदार शासकीय बंगल्यांना खानपान सेवा पुरवत होता. पण वाढत्या महागाईमुळे नव्या कंत्राटातील काही खाद्यपदार्थांचे दर वाढले आहेत.

व्हीव्हीआयपींना शाही दावत

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर येणाऱया व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी मंडळीसाठी आता व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी स्पेशल बुफे लंच आणि डिनरची 520 रुपयांची नवीनच डिश सुरू केली आहे. व्हीव्हीआयपी-व्हीआयपी मांसाहारी लंच आणि डिनर 620 रुपयांच्या दराने उपलब्ध करून दिले आहे. व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी मंडळींसाठी शाकाहारी-मांसाहारी लंच आणि डिनरचा दर 720 रुपये आहे.

           आताचे दर        पूर्वीचे दर

चहा    –    23 रु.         18 रु.

कॉफी   – 16 रु.         13 रु.

इडली      – 35 रु.         27 रु.

वडासांबार   – 35 रु.         28रु.

बटाटावडा  – 32 रु.         27 रु.

शाकाहारी थाळी – 125 रु.    95 रु.

मांसाहारी थाळी   -130 रु.    98 रु.