शांततापूर्ण निदर्शनं करणे लोकशाही विरोधी नाही, पण विद्यार्थ्यांच्या बाबत अन् संसदेत जे काही घडतंय ते मात्र…”, प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेन-झी आंदोलकांवरील सरकारी अत्याचाराविरोधात राजधानी दिल्लीत प्रचंड उद्रेक झाला. हजारो तरुणांबरोबर विरोधी पक्षांचे खासदारही रस्त्यावर उतरले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवास स्थानाबाहेर आंदोलन केले. मात्र पोलिसांनी या खासदारांची धरपकड करत त्यांना बळजबरीने उचलून व्हॅनमध्ये कोंबले. यानंतर काहीवेळाने त्यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणावर काँग्रेस नेत्या, खासदार प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली.

प्रियंका गांधी यांनी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. आमच्या बाबतीत काय घडले हे महत्त्वाचे नाही. विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे घडले ते योग्य आहे की अयोग्य? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत आणि ते आपल्या हक्कांसाठी मागणी करत आहेत. विद्यार्थी संघर्ष करून अभ्यास करतात आणि परीक्षा देतात. मात्र तुम्ही त्यांचे भविष्य उद्धस्त करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

देशभरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या सरकरनने 1.4 लाख कोटी रुपयांचे बजेट दिले आहे. आणि दुसरीकडे तुम्ही अदानी आणि अंबानींची 16 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ करत आहात. शेतकरी, गरीब, विद्यार्थ्यांच्या वाट्याला मात्र काहीचं नाही, असे म्हणत रोष व्यक्त केला. विद्यार्थी कर्ज काढून अशा परीक्षा देतात. फक्त नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचा खर्च 1.4 लाख कोटी आहे, मग बाकी विद्यार्थ्यांचे काय, असे म्हणत खंत व्यक्त केली.

विद्यार्थी बदलाची मागणी करत आहेत. वारंवार प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना घडत आहेत. विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण निदर्शने करणे लोकशाही विरोधी नाही.परंतु विद्यार्थ्यांच्या बाबतीत आणि संसदेत जे काही घडत आहे, ते मात्र लोकशाही विरोधी आहे, असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला.

काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून संसदेत दाखल, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध