शिक्षणाचा खेळखंडोबा! वर्गात मुख्याध्यापिकेची डुलकी; मद्यधुंद पतीची खुर्चीत बसून अरेरावी, संतप्त पालकांनी शाळेला टाळे ठोकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण व्यवस्थेला हरताळ फासण्याचा प्रकार उघडकीस आली आहे. शाळेच्या वेळेत मुख्यध्यापिका थेट वर्गखोलीतच झोपलेल्या आढळल्या, तर त्यांचे पती मद्यधुंद अवस्थेत चक्क मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर ठाण मांडून बसले होते. हा प्रकार पाहून संतापलेल्या पालकांनी शाळेला कुलूप ठोकत तीव्र निषेध नोंदवला. या प्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर ढोके यांचा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर त्याने, “मॅडम शाळेत झोपल्या आहेत,” अशी माहिती दिली. मुलाच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून सुधीर ढोके यांनी स्वतः शाळेत जाऊन पाहणी केली. तेव्हा संबंधित मुख्याध्यापिका वर्गखोलीत झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्या. याच वेळी त्यांचे पती, जे शाळेचे कर्मचारी नसतानाही, मुख्यध्यापकांच्या शासकीय खुर्चीवर बसलेले दिसले. मुख्याध्यापिकांचे पती मद्यधुंद अवस्थेत होते. पालकांनी या बेजबाबदार वर्तनाबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उलट पालकांनाच अरेरावी करत दमदाटी केली. या उद्धट वर्तनामुळे पालकांचा संताप अधिकच अनावर झाला आणि त्यांनी थेट शाळेला कुलूप ठोकून प्रशासनाचा निषेध केला.

दरम्यान, मुख्याध्यापिका वर्गात झोपलेल्या असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित शिक्षिकेची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच या गंभीर प्रकारानंतर सुधीर ढोके यांनी गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित शिक्षिका शाळेच्या वेळेत नियमित उपस्थित राहत नाहीत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात आणि विचारणा करणाऱ्यांना धमकावतात, असे आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत.

संबंधित शिक्षिका या शाळेत रुजू झाल्यापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि शाळेच्या पटसंख्येवर अत्यंत वाईट परिणाम झाला आहे. या खालावलेल्या शैक्षणिक दर्जामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांची नावे या शाळेतून काढून दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. याशिवाय, निवडणुकीशी संबंधित शासकीय जबाबदारीही त्यांनी योग्य रीतीने पार पाडली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वटफळी केंद्राचे केंद्रप्रमुख तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा पंचनामा केला. मात्र, केंद्रप्रमुख पोहोचण्यापूर्वीच संबंधित मुख्याध्यापिका पतीसह तेथून निघून गेल्या होत्या. या प्रकरणाची लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. संबंधित शिक्षिकेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत असून, पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे तसा प्रस्ताव पाठवला जाईल, असे गटशिक्षण अधिकारी मंगेश देशपांडे यांनी म्हटले.