गुलजारांच्या साहित्यिक प्रवासाची साक्षीदार ‘आमची मुंबई’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ म्हटलं जातं. स्वप्न दाखवणाऱ्या आणि पूर्ण करण्याची अभिलाषा जिवंत ठेवणाऱ्या या नगरीची भुरळ लेखक, कवींनी त्यांच्या कलेतून साकारली. लोकप्रिय कवी आणि लेखक गुलजार यांचेही मुंबईशी जुळलेले ऋणनुबंध सात दशकांहून अधिक काळचे. त्यांच्या या साहित्यिक प्रवासाची मुंबई साक्षीदार ठरली. गुलजारांचा हा प्रवास, मुंबईशी जुळलेल्या त्यांच्या भावना अनेक कथा, कवितांमधून व्यक्त झाल्या आहेत. या शहराविषयीच्या त्यांच्या अशाच काही कविता व लघुकथांचा एक निवडक संग्रह ‘आमची मुंबईः माय सिटी इन स्टोरीज अँड पोयम्स’ (Aamchi Mumbai: My City in Stories and Poems) नुकताच प्रकाशित झाला. 512 पानांचे हे पुस्तक ‘कलेक्टर्स एडिशन’ स्वरूपाचे आहे. यात गुलजारांच्या कविता आणि कथांद्वारे मुंबईच्या सात दशकांचे चित्रण असलेले हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी अनुवादास (द्विभाषी) प्रकाशित झाले आहे. रक्षंदा जलील यांनी याचे इंग्रजीत भाषांतर केले आहे. हार्परकॉलिन्स इंडियातर्फे प्रकाशित झालेली ही सुंदर निर्मिती म्हणजे मुंबईला वाहिलेली एक अनोखी मानवंदना आहे. गुलजारजींसारख्या  एका कसलेल्या कथाकाराच्या नजरेतून या शहराच्या लयीचा ताल, गुंतागुंत, आठवणी आणि त्याचा चिरंतन चैतन्यमय आत्मा टिपणारे हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे.