
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
गुणिनां गुणमालोक्य निजबन्धनशङ्कया । राजलक्ष्मीः कुरङ्गीव दूरं दूरं पलायते ।।
गुणी पुरुषांचे गुण पाहून राजलक्ष्मीला अशी भीती वाटते की हे गुण (प्रतिकात्मक असणारी दोरी) मला बांधून ठेवतील. त्यामुळे हरिणी जशी जाळ्यात अडकण्याच्या भीतीने दूर पळून जाते, तशी राजलक्ष्मीही दूर दूर पळून जाते.
येथे ‘गुण’ शब्दावरील श्लेष आहे. या श्लोकात ‘गुण’ या शब्दाचा द्वयर्थी उपयोग केला आहे. 1. गुण, सद्गुण, चांगले गुण, गुणवत्ता 2. गुण, दोरी, रज्जू, बांधण्याचे साधन म्हणूनच ‘गुणिनां गुणमालोक्य’ या वाक्याचे दोन अर्थ होतात- गुणी माणसांचे सद्गुण पाहून… गुण (दोरी) पाहून, त्यात आपण अडकू या भीतीने… ‘राजलक्ष्मीः कुरङ्गीव”’- राजलक्ष्मीची हरिणीशी केलेली उपमा अत्यंत समर्पक आहे. हरिणी जशी जाळ्याच्या किंवा दोरीच्या भीतीने पळून जाते, तशीच चंचल लक्ष्मीही गुणी माणसांकडे टिकत नाही, अशी कवीची विनोदी आणि उपरोधिक कल्पना आहे.

























































