
>> प्रा. आशुतोष पाटील
[email protected]
वडनगर उत्खननातून समोर आलेल्या सात सांस्कृतिक कालखंडांच्या अभ्यासातून वडनगरच्या अगम्य इतिहासाचा मागोवा घेता येतो. वडनगरचा इतिहास हा केवळ एका शहराचा इतिहास नसून पश्चिम भारतातील राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तनांचा आरसाच आहे.
भारताच्या दीर्घकालीन सांस्कृतिक सातत्याचे पुरातत्वीय साक्षीदार असणारे वडनगर. या आधुनिक नगराच्या उत्खननातून हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीचे अवशेष समोर आले आहेत. वडनगरच्या सात सांस्कृतिक कालखंडांच्या अभ्यासातून वडनगरच्या अगम्य इतिहासाचा मागोवा घेता येतो.
वडनगर उत्खननातील एक अत्यंत वैशिष्टय़पूर्ण शोध म्हणजे पद्मासनात बसलेल्या अवस्थेतील मानवी सांगाडा होय. भारतीय पुरातत्त्वशास्त्रात अशा प्रकारचे दफन अत्यंत दुर्मिळ असून यापूर्वी बालाथल, त्रिपुरी आणि आडम यांसारख्या मोजक्याच स्थळांवर अशा स्वरूपाचे पुरावे सापडले आहेत. हा सांगाडा एखाद्या बौद्ध भिक्षूचा किंवा तपस्व्याचा असावा, असा संशोधकांचा तर्क आहे. या शोधामुळे वडनगरमधील धार्मिक परंपरांना एक वेगळाच आयाम प्राप्त झाला आहे.
वडनगरच्या उत्खननातून प्राचीन भारतातील हस्तकला उद्योगाचाही अत्यंत महत्त्वाचा पैलू उलगडून आला आहे. येथे सर्व सांस्कृतिक स्तरांमध्ये शंखापासून तयार केलेल्या बांगडय़ा, मणी, अर्धवट तयार वस्तू, उत्पादनातील टाकाऊ तुकडे आणि उत्पादन प्रक्रियेतील विविध टप्प्यांचे पुरावे मोठय़ा प्रमाणावर आढळले आहेत. यावरून वडनगर हे अनेक शतकांपर्यंत शंख उद्योगाचे एक प्रमुख उत्पादन केंद्र होते, हे स्पष्ट होते. विशेष म्हणजे सिंधू संस्कृतीच्या अस्तानंतर शंख उद्योगाची परंपरा लुप्त झाली होती अशी संशोधकांची पूर्वीची धारणा होती, परंतु वडनगरच्या उत्खननाने ही समजूत बदलून टाकली. येथे शंख उद्योगाचा सातत्यपूर्ण विकास झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. या उद्योगासाठी लागणारे TuRinella pyrum या समुद्री शंखांचे संकलन कच्छच्या आखातातून होत असल्याचे पुरावे आढळतात. यावरून वडनगरचा किनारपट्टीवरील प्रदेशांशी व्यापारी संबंध अत्यंत मजबूत असल्याचे स्पष्ट होते. नाण्यांच्या स्वरूपातील पुराव्यांनीही वडनगरच्या व्यापारी आणि आर्थिक इतिहासावर नवे प्रकाश टाकले आहे. येथे पश्चिम क्षत्रप, मैत्रक, चालुक्य (सोलंकी), गुजरात सुलतान, मुघल, गायकवाड तसेच ब्रिटिश काळातील विविध नाणी प्राप्त झाली आहेत. या नाण्यांबरोबरच इंडो-पॅसिफिक काचेचे मणी, आयात केलेली मृद्भांडी, टॉर्पेडो जार आणि समुद्री उत्पत्तीच्या वस्तू मिळाल्यामुळे वडनगरचे व्यापारजाळे पश्चिम आशिया, पूर्व आफ्रिका, आग्नेय आशिया आणि भूमध्य समुद्र परिसरापर्यंत विस्तारलेले होते, हे स्पष्ट होते.
वडनगर उत्खननातील सर्वात महत्त्वाचा आणि व्यापक परिणाम घडवून आणणारा शोध म्हणजे येथील प्रगत जलव्यवस्थापन प्रणाली होय. भारतातील अनेक प्राचीन शहरे गुप्तकालानंतर वाढत्या कोरडय़ा हवामानामुळे आणि जलटंचाईमुळे ओस पडली. मात्र वडनगरने या संकटावर प्रभावी मात केली. उत्खनन आणि सर्वेक्षणातून नगराभोवती दहा किलोमीटरच्या परिसरात तब्बल चौपन्न जलसाठे, तलाव आणि पाणी साठविणाऱया रचनांची नोंद करण्यात आली आहे. पावसाचे पाणी साठवून वर्षभर त्याचा वापर करण्यासाठी विकसित करण्यात आलेली ही व्यवस्था त्या काळातील पर्यावरणविषयक सखोल ज्ञान आणि दूरदृष्टीचे द्योतक आहे. या उत्खननातून आणखी एक वैशिष्टय़पूर्ण पुरावा समोर आला तो म्हणजे प्राचीन भूकंपाचे संकेत. उत्खननातील सांस्कृतिक स्तरांमध्ये भूकंपामुळे निर्माण झालेल्या संरचनात्मक बदलांचे पुरावे स्पष्टपणे आढळले आहेत. कालीबंगननंतर अशा प्रकारचे पुरावे मिळालेले वडनगर हे भारतातील दुसरे महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ आहे.
सात सांस्कृतिक कालखंडांच्या अभ्यासातून वडनगरच्या राजकीय इतिहासाचाही मागोवा घेता येतो. प्रारंभी मौर्यपूर्व आणि मौर्यकालीन वस्ती, त्यानंतर इंडो-ग्रीक प्रभाव, पश्चिम क्षत्रपांचे राज्य, मैत्रक सत्ता, राष्ट्रकूट, प्रतिहार, चालुक्य (सोलंकी), गुजरात सुलतान, मुघल, गायकवाड आणि अखेरीस ब्रिटिश सत्तेपर्यंतचा सलग इतिहास येथे पुरातत्त्वीय स्वरूपात नोंदविला गेला आहे. प्रत्येक राजवटीने नगराच्या रचनेत, तटबंदीत, धार्मिक वास्तूंमध्ये, मृद्भांड परंपरेत, नाण्यांच्या प्रकारात आणि कारागिरीमध्ये काही ना काही बदल घडवून आणले. त्यामुळे वडनगरचा इतिहास हा केवळ एका शहराचा इतिहास नसून पश्चिम भारतातील राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तनांचा आरसाच आहे.
उत्खननातून प्राप्त झालेले पुरावे वडनगर हे बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक नगर असल्याचे स्पष्ट करतात. बौद्ध विहार, स्तूप, हिंदू मंदिरे, जैन परंपरेशी संबंधित उल्लेख, इस्लामी काळातील वास्तू आणि मध्ययुगीन नागरी विकास या सर्वांचा समन्वय येथे दिसून येतो. म्हणूनच वडनगर भारतीय संस्कृतीतील सहिष्णुता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक समन्वय यांचे एक महत्त्वपूर्ण प्रतीक ठरते.
वडनगरच्या उत्खननातून नगररचना, संरक्षणव्यवस्था, बौद्ध धर्म, शंख उद्योग, व्यापार, नाणकशास्त्र, जलव्यवस्थापन, पर्यावरणीय अनुकूलन आणि सांस्कृतिक सातत्य या सर्व विषयांवर नवी माहिती उपलब्ध झाली आहे. आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञान, स्तरशास्त्राrय (Stratigraphic) उत्खनन, AMS रेडिओकार्बन डेटिंग आणि विविध पुरावशेषांच्या तुलनात्मक अभ्यासामुळे जवळपास 2,750 वर्षांचा अखंड सांस्कृतिक इतिहास वैज्ञानिक पद्धतीने उलगडण्यात संशोधकांना यश आले आहे. या संशोधनामुळे गुजरातच्या इतिहासालाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय नागरीकरणाच्या अभ्यासाला नवे परिमाण प्राप्त झाले आहे.
येथे उभारण्यात आलेले अनुभवात्मक (Experiential) संग्रहालय हे भारतातील पुरातत्त्वीय वारशाच्या सादरीकरणातील एक अभिनव आणि आदर्श उपक्रम मानला जातो. आधुनिक तंत्रज्ञान, दृश्य-श्राव्य माध्यमे, त्रिमितीय सादरीकरण, तसेच प्रत्यक्ष उत्खननातील सांस्कृतिक स्तरांचे जतन करून तयार करण्यात आलेल्या या संग्रहालयामुळे अभ्यागतांना हजारो वर्षांच्या इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अनोखी संधी मिळते. पारंपरिक संग्रहालयांच्या चौकटीपलीकडे जाऊन हे संग्रहालय पुरातत्त्वीय संशोधन, वारसा संवर्धन आणि लोकाभिमुख सादरीकरण यांचा उत्कृष्ट संगम घडवून आणते.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)





























































