
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूंछ जिल्ह्यात अचानक पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या. या आपत्तीत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दिल्ली दौरा अर्धवट सोडून जम्मूकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला.
पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट तहसीलला सर्वाधिक फटका बसला आहे. येथे बचाव पथके तैनात करण्यात आली असून अडकलेल्या नागरिकांची सुटका, बाधित भागातील अडथळे दूर करणे आणि तातडीची मदत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, जम्मू विभागातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून राजौरी शहरात अचानक आलेल्या पुरामुळे सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
अमरनाथ आणि वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित
हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरून तसेच जम्मूमधील भगवती नगर यात्री निवासातून भाविकांना पुढे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
प्रशासनाने सांगितले की, भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार 19 जुलैपासून अमरनाथ यात्रा सर्व बेस कॅम्पवरून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मार्गांची सुरक्षितता आणि हवामानाचा सर्वंकष आढावा घेतल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
याचबरोबर कटरा आणि त्रिकुटा पर्वतरांगांमध्ये प्रतिकूल हवामानामुळे श्री माता वैष्णोदेवी यात्राही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दिल्ली दौरा अर्धवट सोडून ओमर अब्दुल्ला जम्मूकडे
जम्मू विभागातील परिस्थिती गंभीर होत असल्याने मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्लीचा दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपण रविवारी दुपारी जम्मूला जाऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याचे सांगितले.
आज पहाटेपासून राजौरी आणि आसपासच्या भागातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून स्थानिक आमदारांशी सातत्याने संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाचे पहिले प्राधान्य नागरिकांचे प्राण वाचवणे हे असून पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.
ओमर अब्दुल्ला हे शनिवारी राष्ट्रीय परिषदेच्या (नॅशनल कॉन्फरन्स) राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले होते. मात्र जम्मूतील गंभीर परिस्थितीमुळे त्यांनी दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली नियोजित आंदोलन पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

























































