
पालघर तालुक्यातील कुडे गावातील मोरीपाडा येथे गोदामात अनधिकृतपणे साठवून ठेवलेल्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या साठ्यावर मनोर पोलिसांनी रात्री छापा टाकला. या कारवाईत विविध कंपन्यांचे एकूण १२१ गॅस सिलिंडर, गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि इतर उपकरणांसह ४ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत कुडे गावातील मोरीपाडा येथे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अनधिकृत साठा करून त्यांची विक्री तसेच गॅस ट्रान्सफरचा व्यवसाय सुरू होता. याबाबत पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चेतन सातवी यांच्या मालकीच्या जागेत हा गोरखधंदा सुरू होता. कारवाईत गो-गॅस कंपनीचे ३९, भारतगॅस कंपनीचे ६१ तसेच इतर कंपन्यांचे व्यावसायिक गॅस सिलिंडर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी भाजपचा तालुका उपाध्यक्ष
चेतन सातवी हा भाजपचा पालघर तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली असून त्याच्याविरुद्ध मनोर पोलीस ठाण्यात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्याच्याविरोधात पालघर उपविभागीय अधिकारी कार्यालयात हद्दपारीचा प्रस्तावही प्रलंबित आहे.



























































