या देशात हुकुमशाही सुरू झालेली आहे! सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून फरफटत नेण्यावरून, संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकशाहीमध्ये सर्व प्रकारच्या आंदोलनांना मान्यता आहे. या देशावर जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते तेव्हाही महात्मा गांधींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनासाठी उपोषणाचा आणि सत्याग्रहाचा मार्ग स्विकारला होता.. असे म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आंदोलन या विषयावर अधिक बोलताना ते म्हणाले, महात्मा गांधीनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २१ दिवस उपोषण करून शेवटी ब्रिटीश सरकारला चर्चेसाठी समोर आणलं होतं. पण स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये सोनम वांगचुक यांच्यासारखा एक पर्यावरणवादी, वैज्ञानिक जेव्हा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपोषण करतो.. तेव्हा सरकार कोणतीही चर्चा करायला तयार नाही आणि विसाव्या दिवशी नामर्दाप्रमाणे काळोखात चादर टाकून आडवं करून इतक्या मोठ्या माणसाला फरफटत नेले. उपोषणामुळे त्यांच्यामध्ये उभं राहण्याची ताकद नाही त्यांच्यासाठी स्ट्रेचर सुद्धा आणण्याचे सौजन्य दाखवले नाही. जबरदस्तीने उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यावर जो दबाव आणला त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच असे म्हणत संजय राऊतांनी केंद्रावर ताशेरे ओढले.

सोनम वांगचुक हे देशासाठी प्राणत्याग करण्यास तयार आहेत आणि सरकार त्यांना घाबरलंय .. जर सरकार घाबरलं असेल तर त्यांनी तरुणांच्या मागण्यांवर चर्चा करायला पाहिजे होती. यासंदर्भात राऊत म्हणाले, मी आधीही म्हटलंय धर्मेंद्र प्रधान हे काय फार महान शिक्षणतज्ज्ञ किंवा धर्मात्मा नाहीत.. ते एक मंत्री आहेत आणि त्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत.
लाखो विद्यार्थी उद्धवस्त झाले. २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. सरकार पोलिस बळाचा वापर करुन वांगचुक यांना अटक करते.. तरुण कार्यकर्ते अभिजीत दीपके यांच्यावर लाठीहल्ला करुन त्यांना जखमी करतंय..आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर शाईफेक करणअयासाठी प्रवृत्त करतंय असे म्हणत राऊतांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.

हा देश हुकूमशाहीकडे झुकला किंवा वळला असं म्हणतात तर नाही. या देशात हुकूमशाही सुरू झाली आहे एवढंच मी सांगेन असे यावेळी राऊत म्हणाले. उद्या पार्लमेंट सुरू होत आहे, हा विषय पार्लमेंटमध्ये येईल. दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात आम्ही सहभागी होणार असल्याचं यावेळी राऊत म्हणाले.

या आंदोलनाला राजकीय वळण आहे असे सत्ताधारी म्हणताहेत.. या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, हो राजकीय वळण आहे. तुम्हाला राजकीय दृष्ट्या भीती वाटली म्हणून तुम्ही सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं घेऊन गेलात ना.. ही तुमची राजकीय भीतीच आहे ना.. तुम्हाला भीती वाटतेय तुम्ही डरपोक लोक आहात.. तुम्हाला स्वातंत्र्य आंदोलनाची भीती वाटली, पण तुम्हाला ब्रिटीशांची भीती वाटली नाही कारण तुम्ही ब्रिटीशांचे खबरी होता.. तुम्हाला पंडित नेहरूंची भीती वाटते, इंदिरा गांधीची भीती वाटते, सोनम वांगचुकची भीती वाटते, अभिजीत दीपकेची भीती वाटते, उद्धव ठाकरेंची भीती वाटते, शिवसेनेची भीती वाटते.. असे तुम्ही डरपोक लोक आहात असे म्हणत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला.