बेलापूरमध्ये तरुणाची हत्या, आरोपीवर भिवंडीत झडप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेलापूर येथील सेक्टर-१५ परिसरातील डी मार्टजवळ एका तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीवर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडीत झडप घातली आहे. मृत तरुणाचे नाव सलमान शेख असे आहे. दारू पिण्यावरून त्याचे मोहम्मद अन्सारी याच्याबरोबर भांडण झाले. त्यानंतर मोहम्मदने त्याच्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला. यात अन्सारीचा मृत्यू झाला.

भंगाराचा व्यवसाय करणारा सलमान शेख आणि आरोपी मोहम्मद इरफान अन्सारी हे एकत्र दारू पीत असताना दोघांमध्ये शिवीगाळ व धक्काबुक्की झाली होती. या रागातून मोहम्मदने लाकडी दांडक्याने सलमानच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून त्याची हत्या केली. त्यानंतर तो भिंवडी येथे पळून गेला. मोहम्मद भिवंडी येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी भिवंडी येथे सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखा कक्ष-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, विश्वनाथ पांचाळ, लक्ष्मण कोपरकर, राजकुमार दुधाळ, दिनेश जोशी तसेच विनायक गायकवाड, राजेश मोरे, पुरुषोत्तम भोये आणि संतोष तांदळे यांनी केली.