रेल्वेच्या धडकेत सहा हरणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंगलालगतचे रस्ते वन्यप्राण्यांसाठी आता सुरक्षित राहिले नसून वाहनांची गती त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्युमुखी पडला असताना, आज पहाटे जिह्यातील कन्हान परिसरात रेल्वेच्या धडकेत एक-दोन नाही तर तब्बल सहा हरणे मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली. कन्हान रेल्वे स्थानकालगत तुकारामनगर परिसरात पहाटे चार ते पाचच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हरणांचा कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना भरधाव रेल्वेगाडीची धडक बसली. या भीषण धडकेत सहा हरणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत हरणांचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीही हा रेल्वेमार्ग ओलांडताना वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.