
>> प्रज्ञा हुल्याळकर
‘मला काय हवंय?’ हा अनुत्तरित प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी डोकावत असतो, पण ‘तिला काय हवंय?’ या अनुत्तरित प्रश्नाची उकल करण्याचा यशस्वी प्रयत्न प्रसिद्ध लेखिका मेघना साने यांनी त्यांच्या ‘तिला काय हवंय’ या कथासंग्रहातून केला आहे. या कथासंग्रहात एकूण सोळा कथा आहेत. सर्व कथा आजच्या काळातील स्त्रियांच्या आयुष्याभोवती फिरतात. त्यांच्या समस्या, प्रसंग आणि संघर्ष हे आधुनिक युगाशी निगडित आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील या स्त्रियांचं एकच सांगणं आहे – “स्त्रीला हवे असतात कौतुकाचे चार शब्द आणि आत्मसन्मान!”
कथासंग्रहातील पहिली कथा ‘तिला काय वंय!’ या शीर्षकाचीच आहे. या कथेतील नायिका मालिनी चंद्रकांत यांना ठामपणे पत्र लिहिते – “मला काळजीवाहू सरकार नको, माझ्या मान-सन्मानासाठी माझ्या पाठीशी उभा राहणारा जोडीदार हवा आहे.” हे वाचताच चंद्रकांत लेटरपॅड ओढून उत्तर लिहायला सुरुवात करतात…आणि इथेच कथा संपते. चंद्रकांत काय उत्तर देतील, हे लेखिकेने वाचकांवर सोपवले आहे. प्रत्येक वाचकाला विचारात टाकणारा हा कथेचा खास गुण आहे. ‘मानसी’ या कथेत स्त्री लेखिका म्हणून आलेला अनुभव आणि ‘ममा, तुझ्याशी बोलायचंय’ या कथेमधून समाजातील बिघडलेल्या नातेसंबंधांबद्दल लेखिकेने जणू डोळ्यांत अंजन घातले आहे.
‘नवा जन्म’ या कथेतील कुमुदिनीच्या मनातील घालमेल आणि तिला मिळालेला नवा जन्म नेमका कशामुळे, हे जाणून घेण्यासाठी कथा मुळातूनच वाचावी लागेल. ‘रक्षण’ ही कथा तर वयात आलेल्या प्रत्येक मुलीने आवर्जून वाचावी अशी आहे. प्रेमात आंधळी झालेली मुलगी रस्ता चुकली तरी कुटुंबीयांनी तिचे रक्षण कसे करावे, हे संवेदनशीलपणे मांडले आहे. ‘स्त्रियांचं आयुष्य सोपं नसतं’ हा ठळक संदेश देणारी ही कथा आहे.
‘पुरुष’ या कथेत लेखिकेने कथेला सुंदर कलाटणी दिली आहे. वडिलांचे वागणे तरुण मुलीला खटकते, पण आई वस्तुस्थिती स्पष्ट करते. सकारात्मक दृष्टिकोन कथेला वेगळी उंची देतो. ‘उगवला चंद्र पुनवेचा’ या कथेत वृद्ध स्त्रीच्या मनातील अपूर्णतेची जाणीव मांडली आहे. लीना तिच्या सोसायटीत राणाऱ्या आजींना समाधान मिळवून देण्यासाठी जो मार्ग शोधते, तो वाचताना मन भारावून जाते.
सरळ, ओघवत्या भाषेत लिहिलेल्या या कथा नात्यांची वीण अधिक घट्ट करतात. स्त्री-पुरुष नात्याचे जतन, परस्पर आदर आणि आत्मसन्मान यांचा प्रभावी संदेश देणारा हा कथासंग्रह आहे. तरुण-तरुणी, वृद्ध, महिला-पुरुष सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा मनस्पर्शी कथासंग्रह आहे.
या कथासंग्रहाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक कथेतील पात्रं ही आपल्या आजूबाजूला वावरणारी, दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष भेटलेली आहेत असं वाटतं. मेघना साने यांच्या लेखनात वास्तवाची जाणीव आणि आशावादाचा सुंदर संगम दिसतो. स्त्रीच्या अपेक्षा, तिची स्वप्नं आणि व्यथा यांना शब्दरूप देताना मेघना साने यांनी अत्यंत वास्तवदर्शीपणे लेखन केलं आहे. म्हणूनच हा कथासंग्रह केवळ कथांचा संच न राहता तो स्त्रीमनाचा आरसा ठरतो. लेखिकेच्याच शब्दांत सांगायचं झालं तर “कथा म्हणजे काय? एकांतात मनात उमललेलं फूल.” अशी मेघनाताईंच्या मनाच्या जमिनीवर उमललेली ही कथारूपी फुलं नक्कीच वाचकांच्या मनापर्यंत पोहोचतात आणि फुलांच्या जन्माचं सार्थक होतं, हे नक्की!





























































