
>> दिव्या सौदागर
[email protected]
छोटय़ा-मोठय़ा गोष्टीतला विसराळूपणा, ब्लँक होण्याचे प्रकार, मानसिक थकवा, न लागणारी झोप, चिडचिड ही ‘ब्रेन फॉग’ची लक्षणं. ही एक प्रकारची मानसिक अवस्था असते, ज्यामध्ये मेंदू प्रचंड थकतो आणि गोंधळून जातो. मानसिक (नैराश्य, चिंता, आघात) किंवा शारीरिक (अपुरी झोप, वाढलेला क्रीन टाइम, जीवनसत्त्वांची कमी) किंवा दोन्हीही कारणांनी ही समस्या निर्माण होऊ शकते.
मनालीला सकाळी उठवायला साकेत (दोघांची नावे बदलली आहेत) नेहमीप्रमाणे गेला मात्र तो तसाच बाहेर आला आणि चहाच्या तयारीला लागला. मनालीला रात्री खूप उशिरा झोप लागली होती आणि आताही तिची झोपेत चुळबुळ चालूच होती. त्याने जेव्हा थोडय़ा वेळाने खोलीत डोकावून पाहिलं तेव्हा ती उठलेली होती. “मला आजही फ्रेश वाटत नाहीये रे. डोकं आणि मान दुखतेय.’’ असं म्हणत थोडय़ाशा आळसावलेपणातच मनालीची आवराआवर चालू होती. “अरे माझा लॅपटॉप कुठाय? कितीवेळा सांगितलं तुला माझ्या ऑफिसच्या गोष्टी आवरून ठेऊ नकोस म्हणून. हा चार्जर घेऊन मी काय करणार आहे प्रेझेंटेशन?’’ मनाली बेंबीच्या देठापासून ओरडत होती आणि साकेत शांतपणे तिच्याकडे पाहत होता. “तू लॅपटॉप काल ऑफिसमध्येच विसरून आलीस आणि हा चार्जर तुझ्या कलीगचा आहे,’’ असे साकेतने म्हणताच मनालीला तिच्या आक्रस्ताळेपणाची जाणीव झाली.
“मॅम, मनालीचा विसराळूपणा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तुमच्याकडे येण्यापूर्वी आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सगळ्या टेस्ट्स केल्या, पण सगळे रिपोर्टस् नॉर्मल आले आहेत. त्यांनीच समुपदेशनाचा सल्ला दिला आणि आम्ही तुमच्याकडे आलो.’’ साकेत त्यांच्या येण्याचे कारण सांगत होता. मनाली विसरत होतीच, पण हल्ली तिच्या बोलण्यातसुद्धा अचानक ती बोलता बोलता ब्लँक होण्याचे प्रकार वाढत चालले होते. ऑफिसमध्ये जेव्हा मिटिंग्स असत तेव्हा हा प्रकार तिच्याकडून हमखास होई.
“मला काही वेळाने आठवते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. थोडं जरी स्ट्रेसफुल काम असलं तरी ते ओव्हरव्हेलमींग वाटतं. मी इतकी थकते की, डायरेक्ट बेडवर झोपते, पण तरीही फ्रेश नसते. कधीही डोकेदुखी, अंगदुखी चालू झाली आहे. बरं, साकेत मला खूप सांभाळतो. मला फक्त घरी एका जागी बसून राहायचं असतं. हल्ली माझी चिडचिडही भरपूर वाढलीय. टीव्हीचा आवाजही मला सहन होत नाही. पूर्वी मी ऑफिसमधून आले रे आले की, टीव्ही लावायचे.’’ पूर्वीची असलेली मनाली आठवून तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
मनालीचा सततचा छोटय़ा-मोठय़ा गोष्टीतला विसराळूपणा, ब्लँक होण्याचे प्रकार, मानसिक थकवा, न लागणारी झोप, चिडचिड ही लक्षणं तिच्या ‘मानसिक धुकं’ अर्थात ‘ब्रेन फॉग’ची दिसत होती. हे तिच्याशी अधिक बोलल्यावर जाणवलं. मानसीचा त्यामुळे आत्मविश्वास कमी होत चालला होता. तसंच मनाच्या दोलायमान स्थितीमुळे ती रोजची कामंही धडपणे करू शकत नव्हती. तिला तिच्या कामांना, ऑफिसमध्ये मेल करताना किंवा संभाषण करताना मध्येच काही शब्द विसरल्यामुळे तिला वेळ लागायचा. त्यामुळे तिच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभं राहत होतं. आताही तिला प्रेझेंटेशन तयार करायला वेळ लागत होता. कारण कुठची माहिती निवडावी यावर तिचं स्वतचं ठाम मत होत नव्हतं. त्यामुळे ऑफिसमध्ये तिला बॉसची बोलणी खावी लागली.
“मला काही गंभीर तर नाहीये ना मॅम?’’ मनालीने काळजीने विचारल्यावर तिला या अवस्थेविषयी सांगण्यात आलं. हा कुठलाही आजार नाही. ही एक प्रकारची मानसिक अवस्था आहे, ज्यामध्ये मेंदू प्रचंड थकतो आणि गोंधळून जातो. जसं की, पहाटेच्या धुक्यात आपल्याला गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत त्याचप्रमाणे या अवस्थेत मेंदूलाही स्पष्ट विचार करता येत नाहीत. मानसिक धुक्याची कारणं ही मानसिक (नैराश्य, चिंता, आघात) किंवा शारीरिक (अपुरी झोप, वाढलेला क्रीन टाइम, जीवनसत्त्वांची कमी) किंवा दोन्हीही असू शकतात.’’ असं त्यांना समजावलं, तेव्हा साकेतने सांगितलं की, दीड वर्षांपूर्वी तिचे वडील मोठय़ा आजाराने वारले. त्यांच्या जाण्याचा धक्का अजूनही ती पचवू शकली नव्हती. त्यांच्या जाण्याने तिच्या आयुष्यात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली होती. त्याच वेळी तिचं लग्न ठरवावं लागलं आणि लग्नानंतर तिच्यावर अजून एक जबाबदारी आली. यामुळे मनालीचा ताण वाढतच गेला. त्यामुळे ती कुठलीही गोष्ट एकाग्रपणे सांभाळू शकत नव्हती. त्याचाही तिला अपराधगंड निर्माण झाला. ‘मी कोलमडले, असहाय्य झाले. आता मी यातून बाहेर कधीच येणार नाही का?’ या टोकाच्या विचारांच्या सतत प्रभावाखाली राहिल्याने त्याची परिणती ‘ब्रेन फॉग’ या अवस्थेत झाली.
तिच्या या समस्येवर तोडगा म्हणजे तिच्या आघातावर (वडील जाणे) काम करणं हा होता. त्याप्रमाणे मनालीला त्या काळाबद्दल बोलतं करून तिच्यामध्ये साचलेलं दुःख, अविश्वास, हतबलता, अपराधगंड यावर उपाय सुचवण्यात आले. थोडक्यात, मृत्यू हे कटू सत्य असून प्रत्येकाला आयुष्यात याला सामोरं जावंच लागतं आणि त्या वेळी गेलेल्या व्यक्तीच्या सुखद सहवासाच्या स्मृती आठवून पुढे वाटचाल करणं हे करावं लागतं हे सत्रांमध्ये तिला समजावण्यात आलं. त्याकरिता जास्तीत जास्त सकारात्मक व्यक्तींमध्ये राहण्याचा, तसंच नवीन नात्यामध्ये येणाऱया व्यक्तींच्या सहवासात राहण्यासंबंधी तिला सुचवण्यात आलं, जेणेकरून मनाली मनाने मोकळी होईल. अर्थात, त्यासाठी साकेत तयार होताच.
मनाली स्वतवर प्रामाणिकपणे काम करायला लागली. तिने समुपदेशनाच्या मदतीने स्वतची जीवनशैली बदलली. त्या दिवशी दोघांनाही एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जायचे होते. मात्र साकेतने तिथूनच फोन करून आनंदाने एक गोष्ट आवर्जून सांगितली. “मॅम, आज मनाली मला परत मिळाली.’’ मनालीच्या आयुष्यात आलेलं धुकं आता विरून गेलं होतं.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)






























































