
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज नवी दिल्ली येथे करण्यात आली. ‘आर्टिकल 370’ सर्वेत्कृष्ट चित्रपट ठरला. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ला सर्वेत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळाला. ‘आर्टिकल 370’ मधील दमदार अभिनयासाठी यामी गौतम सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरली तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘ब्रह्मयुगम’साठी ममुटी आणि ‘चंदू चॅम्पियन’साठी कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात येणार आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. 2024 या सालातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची या पुरस्काराकरिता निवड करण्यात आली. यंदाच्या सोहळय़ात दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांनी मोहोर उमटवली. राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला श्रीकांत हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार अमरन या तमीळ चित्रपटासाठी राजकुमार पेरियासामी यांना तर दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार रणदीप हुडा यांना स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार रोपश्री वरकाडी (मिथ्या) आणि सचना नमिदास (महाराजा) यांना तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार संजय मिश्रा (भक्षक) यांना देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार अथिष शेट्टी (मिथ्या), अरुणदेव पोथुला (35 चिन्ना कथा काडू) आणि रिद्धिमान बॅनर्जी, तपोमय देब आणि गीताश्री चक्रवर्ती (ओंको की कोठी) यांना प्रदान करण्यात येणार आहे. ‘घरत गणपती’ चित्रपटातील ‘नवसाची गौराई माझी’ या गाण्यासाठी अभय जोधपूरकर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक तर वैकोम विजयालक्ष्मी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ठरल्या. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी योगेश देशपांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘भंगार’ सर्वोत्कृष्ट नॉन फिचर चित्रपट ठरला, तर ‘राम नामी’ सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला.
…आणि विजेते आहेत
सर्वोत्कृष्ट मनोरंजनपर चित्रपट ः कल्की 2898 एडी, राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट ः कॅप्टन मिलर, सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ः 35 चिन्ना कथा काडू, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी ः ब्रह्मयुगम (शेहनाद जलाल), सर्वोत्कृष्ट पटकथा ः पुष्पा 2 (सुकुमार), साऊंड डिझायनर ः मानस चौधरी (भुल भुलैया 3), सर्वोत्कृष्ट संकलन ः आर कालावणन, सर्वोत्कृष्ट संवाद लेखकः लकी भास्कर (वेंकी अटलुरी), सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईनः नितीन चौधरी (कल्की 2898 एडी), सर्वोत्कृष्ट वेशभूषा ः दीपाली नूर आणि शीतल शर्मा (पुष्पा 2), सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनः शाश्वत सचदेव (आर्टिकल 370), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतः जी.व्ही. प्रकाश (अमरन), सर्वोत्कृष्ट गीतः मनोज मुंतशीर (मैदान), सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन ः विजय गांगुली (स्त्राr 2), सर्वोत्कृष्ट अॅक्शन डायरेक्टर ः अनल अरासू (महाराजा), सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट ः पी. रवी कुमार (कमिटी कुर्रोलू).


























































