
>> दुष्यंत पाटील
[email protected]
विश्वविख्यात चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग याचे हे सेल्फ-पोर्ट्रेट. तीव्र मानसिक अस्वस्थता असण्याच्या काळात आरशात पाहून त्याने रेखाटलेले हे स्वतचे चित्र. अंतर्मनाचे, भावनांचे प्रतिबिंब दर्शवत एका कलाकाराने कॅनव्हासवर घेतलेला हा ‘सेल्फी’च, ज्यात त्याच्या मनाचे खोल थर उलगडतात.
आजच्या मोबाईलच्या युगात लोक कुठंही गेले की, खिशातून मोबाईल काढतात आणि पटापट सेल्फी घेतात आणि सोशल मीडियावर अपलोड करतात! बऱयाच वेळेला सोशल मीडियावरच्या या ग्लॅमरस सेल्फी म्हणजे लोकांचं केवळ बाह्य रूप, छान कपडे आणि चेहऱयावरचं खोटं हसू असतं, पण त्यामध्ये सेल्फी घेणाऱया व्यक्तीच्या अंतर्मनाची, भावनांची प्रतिमा येत नाही. 1889 मध्ये एका कलाकारानं कॅनव्हासवर असा ‘सेल्फी’ घेतला की, ज्यामध्ये त्यानं केवळ त्याचं बाह्य रूपच नाही, तर मनाचे खोल थरही उलगडून दाखवले. हा कलाकार म्हणजेच विश्वविख्यात चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग ! त्याच्या या सेल्फीमध्ये (‘सेल्फ-पोर्ट्रेट’ – आत्मचित्र) त्यानं मनातलं वादळ, दुःख, एकटेपणा स्पष्टपणे दाखवला.
व्हिन्सेंट व्हॅन गॉग हा काही लहानपणापासून चित्रकार नव्हता. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्यानं पहिल्यांदा ब्रश हातात धरला. त्याआधी त्यानं धर्मोपदेशक बनायचा प्रयत्न केला. आर्ट डीलर, तसंच शिक्षक म्हणून काम केलं. तो शिक्षक म्हणूनही राबला, पण त्याचं मन कशातच रमलं नाही. एकदा रंग आणि कॅनव्हास हातात आल्यावर मात्र त्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. दहा वर्षांच्या अत्यंत धकाधकीच्या कारकीर्दीत त्यानं जवळ जवळ नऊशेहून अधिक चित्रं काढली. दुर्दैवानं त्याची चित्रं विकली जात नव्हती. असं म्हणतात की, त्याच्या हयातीत फक्त एकच चित्र विकलं गेलं. आयुष्यभर त्याला गरिबीनं पछाडलं होतं.
व्हॅन गॉगनं आपलं शेवटचं सेल्फ पोर्ट्रेट 1889 च्या सप्टेंबर महिन्यात काढलं. हे चित्र काढताना तो फ्रान्सच्या दक्षिण भागातल्या सां-रेमी-द-प्रोव्हान्स या गावातल्या एका मनोरुग्णालयात होता. खरं तर व्हॅन गॉग स्वतहूनच या इस्पितळात दाखल झाला होता. कारण त्याला स्वतच्याच मानसिक अस्वस्थतेची जाणीव होती. त्याआधी काही महिने त्याच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथी होऊन गेल्या होत्या. त्याचा घनिष्ठ मित्र आणि सहकारी चित्रकार असणाऱया पॉल गोगँशी झालेल्या वादानंतर डिसेंबर 1888 मध्ये त्यानं स्वतचा कान कापून घेतल्याची भयानक घटना घडली होती. या घटनेनंतर त्याचे मानसिक विकार अधिकच तीव्र झाले. या त्रासाला कंटाळून, स्वतच्या इच्छेने तो मनोरुग्णालयात दाखल झाला.
मनोरुग्णालयातलं जीवन अतिशय क्लेशदायक होतं. तिथे त्याला एका छोटय़ाशा खोलीत बंदिस्त राहायला लागायचं. जेव्हा त्याचे मानसिक झटके तीव्र असायचे तेव्हा त्याला चित्र रंगवण्याचीही परवानगी नसायची. त्याच्यासाठी त्याची कलाच जगण्याचं एकमेव साधन होती आणि तीच हिरावून घेतली गेल्यावर तो अक्षरशः खचून गेला. त्याला वाटत होतं की, तो वेडा होत चालला आहे आणि यातून तो कधीच बाहेर पडू शकणार नाही. अशा भयानक मनस्थितीत जेव्हा त्याला थोडं बरं वाटलं तेव्हा त्यानं हातात ब्रश घेतला आणि आरशात पाहून स्वतचं हे चित्र रेखाटलं. या चित्रात त्यानं स्वतला कसं दाखवलं आहे ते नीट पाहिलं तर त्याच्या मनोविश्वात डोकावायला मिळतं, त्याच्या वेदनांची तीव्रता पाहायला मिळते.
चित्रामध्ये व्हॅन गॉगच्या चेहऱयाकडे नीट पाहिलं तर तो एकदम स्थिर आणि शांत दिसतो, पण त्याच्या मागचा जो बॅकग्राऊंड आहे, त्यातल्या रेषा गोल गोल आणि चक्रावून टाकणाऱया आहेत. हा विरोधाभास दाखवतो की, व्हॅन गॉग बाहेरून स्वतला कितीही शांत दाखवण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याच्या डोक्यात आणि मनात विचारांचं मोठं वादळ सुरू होतं. व्हॅन गॉगनं हे पेंटिंग त्याचा भाऊ ‘थिओ’ याला पाठवलं होतं. सोबत एक पत्रही लिहिलं होतं. या पत्रात तो म्हणाला होताः “तू हे चित्र जरा निरखून बघ. तुला जाणवेल की, माझ्या चेहऱयावरचे भाव आधीपेक्षा बरेच शांत झालेत, पण माझ्या डोळ्यांमध्ये तीच जुनी भीती आणि असुरक्षितता अजूनही कायम आहे.” त्याचे ते डोळे थेट आपल्याकडे बघतात आणि त्याच्या मनातली अस्वस्थता आपल्याला जाणवून देतात.
पेंटिंगमध्ये त्याचे लाल-नारिंगी रंगाचे केस आणि दाढी उठून दिसते. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या दाढीचे , केसांचे वळण, कपडय़ांवरच्या रेषा आणि बॅकग्राऊंडचे वळण बऱयाच अंशी सारखेच आहेत. जणू काही तो बॅकग्राऊंड आणि व्हॅन गॉग वेगळे नसून एकच आहेत असं त्याला सुचवायचंय. ते वादळ त्याच्या स्वतच्या अस्तित्वाचाच एक भाग बनलं होतं, असं आपल्याला चित्र पाहताना जाणवतं. या पेंटिंगमध्ये वापरलेले रंग व्हॅन गॉगची मानसिक स्थिती, त्याचं आजारपण आणि उदासपणा सुचवतात.
जन्मभर संघर्षमय जीवन जगणाऱया व्हॅन गॉगच्या चित्रांची किंमत जगाला कळायला मात्र बराच काळ गेला. त्याचं हे सेल्फ पोर्ट्रेट आज कलेच्या इतिहासातला मास्टरपीस म्हणून ओळखलं जातं.






























































