
दापोली तालुक्यातील फरारे गावातील मयूर अनंत भागणे यांनी NEET 2026 परीक्षेत ऐतिहासिक यश संपादन करत देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांमध्ये 100 पर्सेंटाईल गुणांसह देशात 102 वा क्रमांक पटकावत मयूर याने कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
देशातील सर्वात कठीण स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या NEET मध्ये मिळवलेले हे यश त्यांच्या जिद्द, अथक परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित मानले जात आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे फरारे गावासह संपूर्ण दापोली तालुका आणि कोकण परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून मयूर भागणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मयूर यांच्या यशामागे त्यांचे वडील अनंत भागणे, कुटुंबीय आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ असल्याची भावना व्यक्त केली.
शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांचे हे मोठे फळ असल्याचेही अनेकांनी सांगितले. मयूर भागणे यांच्या या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला असून, मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती जिद्दीच्या बळावर पूर्ण करण्याची प्रेरणा त्यांच्या यशातून मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.































































