जम्मू-कश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, पुढील सूचना मिळेपर्यंत अमरनाथ यात्रा स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खराब हवामानामुळे जम्मू आणि कश्मीरमधील अमरनाथ यात्रा 19 जुलैपासून पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. हवामान विभागाने जम्मू आणि कश्मीरच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक येणारे पूर, भूस्खलन आणि इतर हवामान-संबंधित आपत्त्यांचा धोका वाढल्याने ही तात्पुरती स्थगिती लागू करण्यात आली आहे. यात्रेकरूंना दोन्ही बेस कॅम्पच्या पुढे जाण्यास परवानगी दिली जाणार नाही.

पुढील काही दिवसांत खराब हवामानाचा अंदाज आणि यात्रेकरूंची सुरक्षा व कल्याण सुनिश्चित करण्यासाठी, पहलगाम आणि बाल्टाल या दोन्ही मार्गांनी होणारी श्री अमरनाथ यात्रा 19 जुलैपासून तात्पुरती स्थगित करण्यात येईल, असे कश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी सांगितले. आदेशानुसार, 19 जुलैपासून पुढील सूचना मिळेपर्यंत यात्रेकरूंना बाल्टाल आणि नुनवान/चंदनवारी बेस कॅम्पच्या पुढे जाण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हवामानाच्या परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतर आणि यात्रेकरूंसाठी मार्ग सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबतची अद्ययावत माहिती योग्य वेळी दिली जाईल, असे प्रशासनाने सांगितले.