
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये हजारो कोटी रुपयांची चोरी आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणी एसआयटी कारवाई सुरू असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक संयुक्त पत्र लिहिले आहे. अशा गंभीर गुन्ह्यावर आपले मौन असणे अस्वीकारार्ह आहे. या प्रकरणात उत्तरदायित्व निश्चित करणे आणि नुकसान भरपाई मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे, अशा कडक शब्दांत दोन्ही नेत्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये हजारो कोटी रुपयांची चोरी झाली आहे. याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. देशातील लाखो भाविकांनी अत्यंत श्रद्धेने आणि कष्टाच्या पैशातून मंदिरासाठी देणग्या दिल्या होत्या. मात्र, या चोरीमुळे भाविकांमध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे, असे मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. राम मंदिर ट्रस्टच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची एका स्वतंत्र आणि सर्वसमावेशक यंत्रणेमार्फत तातडीने चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
“Your silence now in the face of such a crime is unacceptable. It is your duty to ensure accountability and restitution.”
Congress President Shri @kharge and LoP Shri @RahulGandhi wrote a letter to PM Modi demanding an independent and comprehensive investigation into the… pic.twitter.com/naLVTH8aFH
— Congress (@INCIndia) July 19, 2026
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपण संसदेत या ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केली होती. परंतु, या ट्रस्टच्या सर्व सदस्यांची नियुक्ती केवळ आपल्या सरकारद्वारे करण्यात आली आहे. हे सदस्य आरएसएस, व्हीएचपी आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांशी जोडलेले आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. ट्रस्टचे वादग्रस्त माजी सरचिटणीस हे देखील आपले निकटवर्तीय होते, असा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.
या ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची तातडीने स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. यामध्ये रोख रक्कम, सोने आणि चांदी यांसह सर्व प्रकारच्या दानांच्या व्यवस्थापनाची तपासणी व्हावी. या चौकशीचे निष्कर्ष आणि ट्रस्टचे सर्व हिशोब जाहीर केले जावेत. जेणेकरून प्रत्येक भाविकाला त्याच्या दानाचा कसा वापर झाला हे समजेल. यामध्ये दोषी आढळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर, मग त्याचे पद किंवा प्रभाव कितीही मोठा असला, तरी कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तुमचे सरकार आणि या ट्रस्टची विश्वासार्हता तुम्ही किती पारदर्शक आणि वेगाने पावले उचलता यावर अवलंबून आहे. देशातील जनता आपल्या भूमिकेकडे बारीक लक्ष ठेवून आहे, असेही पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

























































