रुग्णालयावरून विश्वास उडाला, सोनम वांगचुक यांच्या पत्नीची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सफदरजंग रुग्णालयाकडून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय माहितीत तफावत असल्याचा आरोप करत त्यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी रविवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. वांगचुक यांना आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी आणि त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड होण्यापूर्वी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

गीतांजली अंगमो यांनी एक्सवर पोस्ट करत सफदरजंग रुग्णालयावरील विश्वास उडाल्याचे म्हटले आहे. रुग्णालयाने वांगचुक यांच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी 2.9 पर्यंत घसरल्याचे सांगितले असून ती धोकादायक आणि जीवाला धोका निर्माण करणारी असल्याचे कुटुंबाला कळवले. मात्र, रुग्णालयाने मेडिकल बुलेटिनमध्ये हा आकडा न देता केवळ पोटॅशियमची पातळी कमी होत असल्याचा उल्लेख केला, असा आरोप त्यांनी केला.

याशिवाय स्वतंत्र प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीत पोटॅशियमची पातळी 3.5 आढळली असून ती सामान्य मर्यादेत असल्याचा दावाही त्यांनी केला.

रुग्णालयाने वारंवार विनंती करूनही वांगचुक यांना डिस्चार्ज देण्यास किंवा खासगी रुग्णालयात हलवण्यास नकार दिल्याचा आरोपही अंगमो यांनी केला. तसेच रुग्णालयाच्या मजल्यावर सुमारे 30 आणि संपूर्ण रुग्णालयात 100 हून अधिक पोलिस तैनात असल्याने कुटुंबीयांच्या हालचालींवर निर्बंध आले असून ही वैद्यकीय सेवा नसून बेकायदेशीर नजरकैद असल्याचा आरोप त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वांगचुक यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. आपल्या प्रिय व्यक्तीवर कुठे उपचार करायचे हे ठरवण्यासाठी कोणत्याही कुटुंबाला व्यवस्थेशी संघर्ष करावा लागू नये, असेही अंगमो यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सफदरजंग रुग्णालयाने रविवारी सकाळी 8.30 वाजता प्रसिद्ध केलेल्या आरोग्य बुलेटिनमध्ये वांगचुक यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे सांगितले. सध्या त्यांची जीवनावश्यक लक्षणे स्थिर असली तरी रक्तातील काही घटकांमध्ये किरकोळ बदल असल्याचे रुग्णालयाने नमूद केले आहे.

दीर्घकाळ उपोषणामुळे शरीरावर होणारा ताण आणि त्याचे परिणाम लक्षात घेता वांगचुक यांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या सतत देखरेखीखाली उपचारांची गरज असल्याचेही रुग्णालयाने स्पष्ट केले.

नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून शनिवारी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.