
भाजपने हिंदू राष्ट्राचे स्वप्न दाखवून मते मिळवली. लोकांना अंधभक्त बनवले. भाजपचे हिंदू राष्ट्र कसे असेल, याची झलक ‘अयोध्ये’च्या राममंदिरात दिसत आहे. न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत संविधान मोडले आहे व त्यावर भ्रष्टाचाराचा झेंडा फडकत आहे.
मुसळधार पावसात 6700 कोटी खर्च झालेला ‘कनेक्टिंग लिंक’ बोगदा ढासळला व गळू लागला. विरोधकांनी त्यावर टीकेची झोड उठवली, पण महाराष्ट्रातील सरकारने त्यावर प्रतिक्रिया दिली, “वेगवान वारे आणि संततधार यामुळे हे घडले.” सरकार किती खोटे बोलते ते यावरून दिसते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी काय सांगावे? “विरोधक महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. राज्याची बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही!” विरोधकांनी भ्रष्टाचार उघड केला यात कसली आलीय बदनामी? महाराष्ट्रातले आमदार-खासदार 50-50 कोटींना विकले गेले ही बदनामी नाही तर काय देवाने केलेली पुष्पवृष्टी आहे? 70 दिवसांत कनेक्टिंगचा टनेल गळू लागला हे भूषणावह नाही. अयोध्येतले राममंदिर तर उद्घाटनानंतर 26 व्या दिवशी गळू लागले तेथे कनेक्टिंग लिंक कोसळले त्याचे काय घेऊन बसलात? महाराष्ट्रासह देशात शंभर वर्षांपूर्वीच्या इमारती ‘ताठ’ उभ्या आहेत. मुख्यमंत्री, मंत्र्यांचे बंगले पावसात ढासळत नाहीत आणि गळत नाहीत. इंग्रज काळात व त्यानंतर उभी राहिलेली अनेक धरणे, प्रकल्प मजबुतीने उभे आहेत. कारण या सर्व प्रकल्पांत कोणी पैसे खाल्ले नाहीत. आज असे म्हणता येईल काय? 6700 कोटींचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ फक्त 67 दिवसांत नादुरुस्त झालेला दिसला. 6700 कोटींत भ्रष्टाचार, अपहार किती झाला व त्या अपहारातला कोणाला किती वाटा गेला याचे ऑडिट झाले तर सरकारमधला प्रत्येक घटक किती टक्क्यांवर काम करतो ते उघड होईल. सध्या आपल्या देशावरचे सर्वात मोठे संकट नैतिक आहे. कुणाला कशाची लाज वाटेनाशी झाली आहे. आतापर्यंत राजकारण्यांना लाज नाही असे इतर शहाजोगपणे मानत होते. हल्ली न्यायमूर्तींनाही लाज वाटेनाशी झाली आहे. सरकारची चमचेगिरी करण्याची व विरोधकांचा आवाज दाबण्याची जणू स्पर्धाच या सर्व न्यायमूर्तींत सुरू आहे. हे न्यायमूर्ती सरकारच्या राजकारणातील प्यादे बनतात आणि पुन्हा व्यासपीठावर येऊन नैतिकतेच्या गोष्टी सांगतात. त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार?
मोदी विदेशात
प्रभू श्रीराम मंदिराच्या लुटीने खळबळ माजली असताना पंतप्रधान मोदी हे पुन्हा तीन देशांच्या विदेश दौऱ्यावर गेले. भारतात प्रश्नांचा डोंगर उभा असताना मोदी हे परदेशात जाऊन काय करतात? एखादा देश त्यांना पुरस्कार किंवा मेडल देतो असे म्हणताच मोदी तेथे पळत जातात, अशी त्यांची चेष्टा जागतिक पातळीवर सुरू आहे. अस्तित्वात नाहीत असे पुरस्कार किंवा मेडल्स काही देशांनी मोदींच्या गळ्यात घातली. भारतीय प्रतिष्ठेला ‘चुना’ लावण्याचा हा प्रकार आहे. जगातला एकही प्रतिष्ठेचा पुरस्कार पंतप्रधान मोदींना मिळालेला नाही. अनेक थुकरट पुरस्कार घेण्यासाठी मोदी विदेश दौरे करतात व जनतेच्या तिजोरीवर भार टाकतात. मोदींनी देश किंवा समाजासाठी असे कोणते काम केले की, त्यांना पुरस्कार मिळावा? सोनम वांगचुक हे महान सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण तज्ञ दिल्लीच्या जंतर मंतरवर दहा दिवसांपासून उपोषण करीत आहेत. ‘नीट’ पेपरफुटीने लाखो विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान या सगळ्याला जबाबदार आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढा या मागणीसाठी हे उपोषण आहे, पण मोदी यांनी वांगचुक यांच्या उपोषणाची दखल तर घेतली नाहीच, उलट धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालण्याचे काम त्यांनी चालूच ठेवले आहे. शैक्षणिक क्षेत्रात पूर्ण Mess झाला आहे व भारतीय विद्यापीठांतील पदव्यांना जगात कोणी किंमत देत नाही. मोदी मंत्रिमंडळातील बहुसंख्य मंत्र्यांची मुले परदेशात शिकत आहेत व तेथेच स्थायिक झाल्याने भारतीय पदव्यांचे अवमूल्यन झाल्याचा फटका या सगळ्यांना पडत नाही. मोदी सरकारच्या काळात रुपयाचे अवमूल्यन झाले, पण मोदींमुळे जगात भारताची मान उंच झाली हा दावाही ‘कनेक्टिंग लिंक’मुळे कोसळला. ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये हिंदुस्थानच्या पासपोर्टची घसरण झाली आहे. पासपोर्टच्या क्रमवारीत पहिल्या शंभरामध्येही भारताला स्थान मिळवता आलेले नाही. पासपोर्टच्या इंडेक्समध्ये भारत 125 व्या क्रमांकावर म्हणजे ‘खालून’ थोडा वर इतकेच म्हणायला हवे. मोदी 2014 साली सत्तेवर आले तेव्हा भारताचा पासपोर्ट 76 व्या स्थानी होता. आज त्याचे साफ धिंडवडे निघाले आहेत! मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या बदनामीविषयी आता बोलू लागले, पण त्यांच्या काळात महाराष्ट्राची मोठी घसरण सुरू आहे. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् राहिलेला नाही. राज्याची श्रीमंतीही रसातळाला गेली. श्रीमंत राज्यांच्या यादीत गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला व पहिल्या पाचातही महाराष्ट्र नाही. याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र पिछाडीवर गेला. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतही महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत मागे पडला. ही बदनामी तर जागतिक बँकेने केली आणि फडणवीस त्याचे खापर विरोधकांवर फोडत आहेत.
गायींच्या नावानेही लूट
फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील काही बाटगे अधूनमधून हिंदू राष्ट्राची उकळी फोडत असतात. या लोकांना जे हिंदू राष्ट्र हवे आहे त्याची झलक सध्या अयोध्येत दिसत आहे. देव, धर्म आणि राष्ट्र लुटण्यास मान्यता देणाऱ्यांना उघड संरक्षण असे एक हिंदू राष्ट्र अयोध्येत सध्या सुरू आहे. हिंदुत्वाच्या नावाने हे सर्व लोक कशी लूट करतात त्याचे उदाहरण भाजपशासित राजस्थानात समोर आले. राज्यात ‘गोशालां’ना अनुदान मिळते म्हणून अनेक नकली हिंदुत्ववाद्यांनी नकली गोशाला उघडून सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले. यातील बहुतेक गोशाला श्रीराम व श्रीकृष्णाच्या नावाने आहेत. भ्रष्टाचाराची कमाल अशी की, मृत गायींना कागदावर ‘जिवंत’ दाखवून या गोशालांनी साधारण शंभर कोटींचे अनुदान लुटले. ही सर्व गडबड महालेखाकारांच्या आाडिटमध्ये स्पष्ट झाली. एका बाजूला गायीला गोमातेचा दर्जा देण्याची मागणी करायची. गोवंश हत्याबंदीचा कायदा करायचा. ‘बीफ’ विकणाऱ्यांच्या हत्या, झुंडबळी घ्यायचे व त्याच वेळी गायींच्या नावावर बनावट पद्धतीने अनुदान लाटायचे. प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील हिशेबात अफरातफर आहे. आता नाशिकच्या कुंभमेळ्याचा सरकारी खजिना लुटला जाईल. त्यात गुजरातचे ठेकेदार हात धुऊन घेतील. नाशिकच्या कुंभमेळ्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांचे ‘चंपतराय’ गिरीश महाजनांवर सोपवली गेली आहे. त्यामुळे गोदावरीलाही धक्का बसला असेल. हिंदुत्व आणि धर्म हे लुटीचे साधन बनले आहे.
ताबा कोणाचा?
देशातील सर्व प्रमुख मंदिरांवर भारतीय जनता पक्षाने ताबा मिळवला. मंदिरांच्या विश्वस्त संस्थांवर सरळ राजकीय नेमणुका आता होतात. शिर्डीच्या साईबाबा संस्थानावर विश्वस्त मंडळच नाही व हायकोर्टाच्या माध्यमातून मंदिराचा कारभार पाहिला जातो, पण साईबाबांच्याही वर तेथे राधाकृष्ण विखेंचा हुकूम चालतो. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची सूत्रे भाजपने त्रिपाठी नामक व्यक्तीकडे दिली. हे त्रिपाठी मंगल प्रभात लोढा यांचे खास आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद, एशियाटिक लायब्ररी अशा सार्वजनिक साहित्य संस्था लोकशाही मार्गाने भाजपने घेतल्या हा दावा खोटा आहे. या संस्थांवरही हिंदू राष्ट्र प्रस्थापित व्हावे यासाठी बिल्डर, धर्मादाय आयुक्त आणि न्यायालयांचे अमूल्य सहकार्य या मंडळींना लाभले. लोकसभा, विधानसभा व सार्वजनिक संस्थांतही विरोधी विचारांचे लोक ठेवायचे नाहीत. विरोध करणाऱ्यांना विकत घ्यायचे किंवा सरळ नष्ट करायचे. पोलीस व तपास यंत्रणा त्यासाठी उघड वापरायच्या हे भाजपच्या नव्या हिंदू राष्ट्राचे सूत्र आहे. न्यायालयातही आता संघाच्याच शाखा निर्माण झाल्या. निवडणूक आयोगाने तर कधीच हाफ चड्डी परिधान केली. त्यामुळे पक्षांतरे, पक्षफुटींबाबत निर्णय द्यायचा नाही, हे ठरवूनच टाकले. भ्रष्टाचाराविरुद्ध तर निकालच नाही. भारताचे लोक स्वातंत्र्य विकून खातील असे चर्चिल म्हणाला, ते आता खरे वाटू लागले. भाजपप्रणीत हिंदू राष्ट्राची ही झलक आहे.
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]






























































