अनुबंध – सुखसोहळा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
anubandh-sukhasohala-monsoon-essay-aruna-divegawkar-rain-nakshatra-mridgandha

>> अरुणा दिवेगावकर

पहिल्या पावसाची सर धरतीवर पडली की पुढचा सारा प्रवास त्याची नानाविध रूपं न्याहाळत सार्थकी लागावा असाच हा पाऊस. हुरहुर लावणारी नक्षत्रं वाट्याला येत असतीलही, पण पावसाच्या साक्षीने त्यांचं येणं.. याची बात काही औरच! असा हा सुखसोहळा अशा पाऊसवेळा!

पाऊस कधीचा पडतो आहे अखंड…प्रत्येक मोसमात…प्रत्येक ऋतुचक्रात…युगानुयुगे! तरीही त्याच्याबद्दलचं आकर्षण कमी होत नाही. त्याच्या आगमनाची आस संपत नाही. दूरवरून तो आपल्या आगमनाची चाहूल देतो आणि माणूसच काय, सारी सृष्टी त्याचा स्वागताला सज्ज होते.

काळ्याभोर झाकोळलेलं आभाळ! त्या निळसर काळोखात कृष्णाची निळाई पांघरून येणारा पाऊस मलाही वेडावून टाकतो. मी धावत अंगणात जाते. टपकन् एक टपोरा थेंब अंगणात आपला ठसा उमटवतो. हळूहळू त्याचे सोबती धावत येतात. ठिपक्यांची रांगोळी घालतात. बघता बघता ठिपके जोडले जातात अन् अंगणात तळं साचू लागतं. त्यात थेंबांचं लयदार नर्तन सुरू होतं. पावसाचे टपोरे थेंब त्यातून उसळणारं बेभान लयबद्ध संगीत! अशा पहिल्या पावसाची सर धरतीवर पडावी अन् सारा आसमंत मातीच्या गंधात न्हाऊन जावा.

या सुगंधाचे कारण म्हणजे जमिनीवरील मातीत कित्येक जिवाणू वास करत असतात. या जिवाणूंमध्ये ‘असिनोमायसेटिस’ नावाचा जिवाणू असतो. जेव्हा पाऊस नसतो तेव्हा हा जिवाणू मातीचे कवच (स्पोअर्स) स्वतभोवती तयार करून जमिनीवर राहतो. उन्हाने तापलेल्या मातीवर पाऊस पडला की, ते मातीचे कवच हवेत उधळतात अन् हे एअरसोल आपल्या नाकापर्यंत पोहोचतात आणि सुगंधाची उधळण करतात. शास्त्रीय कारणे काहीही असली तरी या मृदगंधाची सर जगातल्या कुठल्याच अत्तराला येत नाही.

पाऊस पडत राहतो, मनामनात मोरपिसारा फुलवत राहतो. असा हा पाऊस! त्याची रूपं तरी किती! ‘येरे येरे पावसा’ म्हणत भिजणाऱ्या बच्चे कंपनीसाठी नाचणारा पाऊस!

कागदाच्या होडय़ा सोडणाऱयांसाठी ओहोळ बनून रस्त्यावरून धावणारा पाऊस. शाळा ते घराच्या रस्त्यावर रेनकोट असूनही शाळकरी पोरांना भिजवणारा खट्याळ पाऊस. अडनिड्या वयातल्या श्वासांची लय बिघडवत कविता करायला भाग पाडणारा तरल पाऊस! कॉलेजच्या रंगीन वयात सिनेमाच्या पडद्यावरचा पाऊस प्रत्यक्ष अनुभवायला आसुसलेला तरुण पाऊस. प्रेमी युगाला एक अकेली छत्रीमध्ये भिजवणारा रोमॅन्टिक पाऊस. संसाराच्या रहाटगाडग्यात फिरणाऱ्या गृहिणीची फजिती करणारा पाऊस!

आयुष्याचे चटके सोसल्यावर अचानक समोर आलेला, चिरतरुण होत जुन्या आठवणींचे तुषार अंगावर झेलत सुखाचा शहारा आणणारा अवकाळी पाऊस. लगबगीने घराकडे निघालेल्या शेतकरी बायांना हटकून नखशिखांत भिजवत त्यांचा रस्ता संपेपर्यंत येरझारा घालत छळणारा अवखळ पाऊस! उन्हाच्या तापाने सुकलेल्या झाडाझुडपांना आपल्या सरींनी टवटवी देणारा संजीवक पाऊस! रोडावलेल्या सरितेला (नदीला) गर्भिणी करणारा प्रियकर पाऊस. शेतकऱयांना सतत आशा, निराशेच्या झुल्यावर झुलवणारा बेभरवशी पाऊस!

मृग, आर्द्रा, पुनर्वसू, उत्तरा, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त ही नऊ नक्षत्रे पावसाची मानली जातात. तसे रोहिणीदेखील मान्सूनपूर्व नक्षत्र धरले जाते. या सगळ्या नक्षत्रांच्या पावसासोबत तरणा पाऊस, म्हातारा पाऊस, आसळकाचा पाऊस, सासूचा पाऊस, सुनांचा पाऊस, रब्बीचा पाऊस, हत्तीचा पाऊस अशीदेखील गमतीदार नावे पावसाला दिलेली आहेत तशी आता उन्हाळी पाऊस, हिवाळी पाऊस अन् पावसाळी पाऊस अशी बारमाही पावसाची रूपेही पाहायला मिळतात.

काळ पुसरकला. गावांचे उंबरे शहरांकडे सरकले. शहरांची धाव महानगरांकडे गेली. सगळं वेगानं बदलत गेलं, पण पाऊस मात्र तसाच राहिला. इंग्रजी तारखेनुसार 7 जूनला मृग नक्षत्र सुरू होते म्हणजे होतेच!

मृगाच्या आधी वळवाचा पाऊस पडतो. त्याला अवकाळी पाऊस म्हणतात, पण हा पाऊस कधी कधी नुकसानदायकच असतो. हा कडाडतच येतो. जणू काही उन्हाची शिक्षा कमी असते म्हणून तो आसूड मारून सृष्टीला आणखी बेजार करीत असतो. पावसाच्या नऊ नक्षत्रांपैकी मृग नक्षत्रावर साऱयांचे लक्ष असते. ‘औंदा मिरगान चांगली साथ दिली’ म्हणणारा तृप्त झालेला शेतकरी… आषाढाचा पाऊस मनासारखा पडल्यावर तहानलेली झाडे तृप्त होतात. सगळीकडे हिरव्या रंगांची उधळण सुरू होते. त्यात सकाळ प्रसन्न असतानाच आभाळात इंद्रधनुष्याच्या रंगांचा उत्सव सुरू झाला की, श्रावण सुरू झाला असे समजावे.

तांबूस पिवळ्या सोनेरी उन्हात जेव्हा श्रावणाच्या रेशमी धारा मिसळतात.. पशू-पक्ष्यांत, झाडाझुडपांत ऊबदार मायेची भरती आलेली दिसते. कधी न पाहिलेली अनोळखी झाडं झुडपंही जणू आपल्याशी ओळख करून घेण्यासाठीच फुलतात. फुलापानांवर मृगाचे लाल लाल किडे, हिरव्या, पोपटी नक्षीदार अळ्या, लांब उडी मारणारे हिरवे नाकतोडे, नयनरम्य फुलपाखरांचे थवे तरंगत असतात. मनमोहक, नक्षीदार आणि विलोभनीय रंगाचे कीटक मजेत फिरताना, तर काही अंडय़ांवर मायेची ऊब देत बसलेले दिसतात. अशी पावसाची किमया बघत राहावी!

खरं तर पावसाळ्यातील पावसाची ही रूपे घराच्या खिडकीत बसून चहा पित आणि गाणी ऐकत बघण्याची गोष्ट नाहीच. पाऊस सर्वांगांनी, पंचेंद्रियांमार्फत अनुभवायचा विषय आहे. प्रत्येक पावसाळ्यात हा नखशिखांत भिजण्याचा अनुभव घेतल्याशिवाय सार्थक झाल्यासारखं वाटतच नाही. प्रत्येक पावसाळ्यात मनभर कोसळून पाऊस परतीला लागला की, एक अनामिक हुरहुर दाटते मनात. जणू जिवलग सोडून जातोय. असा हा पाऊस दरवर्षी भेटतोच अन् काळजात रुतून बसतो.

पण हल्ली तो फार लहरी झाला आहे. कधी कधी सारी नक्षत्रं कोरडी जातात अन् कधी इतका तुफान बरसतो की, सारं काही जलमय… पाऊस का रुसतो.. का रुद्रावतार धारण करतो, याचा विचार करण्याची वेळ आली आहे हे मात्र नक्की!
(लेखिका साहित्यक्षेत्रात कार्यरत आहेत.)