
रोजगारासाठी तेलंगणात गेलेल्या चंद्रपूर जिह्यातील मजुरांवर काळाने भीषण घाला घातला. धान्याच्या रोवणीचे काम करून ऑटोने घरी परतत असताना तेलंगणातील एका बसने जोरदार धडक दिल्याने यात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत.
अतुल सोनुले, अर्चना सोनुले आणि रंजना प्रभाकर शेंडे अशी मृत मजुरांची नावे आहेत. सिंदेवाही तालुक्यातील पवना चक आणि पवनपार येथील 23 मजूर तेलंगणातील एका पंत्राटदाराकडे धानाची रोवणी करण्यासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास शेतातील कामे आटोपून सर्व मजूर ऑटोने घराकडे परतत होते. हा ऑटो स्वतः कंत्राटदार चालवत होता. तेलंगणाच्या एका भरधाव बसने त्यांच्या ऑटोला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ऑटोचा चेंदामेंदा झाला. यात तिघांचा मृत्यू झाला असून 19 जण किरकोळ जखमी झाले.



























































