
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या राज्यभरातील रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई करा, अशी मागणी शिव विधी न्याय सेनेच्या (महाराष्ट्र) वतीने मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये, विशेषतः रिक्षा-टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यामुळे गंभीर अपघात होण्याची किंवा कायमस्वरूपी अपंगत्व होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर विशेष तपासणी व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात यावी, रिक्षा-टॅक्सीतून होणारी बेकायदा वाहतूक बंद करावीत, संबंधित चालक-मालकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे परवाने निलंबित करावे, अशी मागणी शिव विधी न्याय सेनेच्या उपाध्यक्षा अॅड. स्वप्ना कोदे आणि सरचिटणीस अॅड. मनोज कोंडेकर यांनी केली आहे.



























































