Pune Moshi tragedy – न घेतलेली सुट्टी जीवनाची अखेर ठरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरवर्षी माउलींच्या पालखी प्रस्थानासाठी सुट्टी घेणाऱ्या सुनील कोरके यांनी कामाच्या व्यापामुळे यंदा सुट्टी घेतली नाही आणि बुधवारी ते कामावर गेले. मात्र, यंदा न घेतलेली सुट्टी त्यांच्या जीवनाचीच अखेर ठरली. मूळचे पंढरपूरचे असलेले सुनील गेली १० वर्षे असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होते. अवघ्या २५ दिवसांपूर्वी त्यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले होते. त्या लेकराच्या भविष्यासाठी अनेक स्वप्ने त्यांनी रंगवली होती. मात्र, नियतीने ती स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त केली.

त्यांचा जुळा भाऊ अनिल कोरके आई-वडिलांची जबाबदारी सांभाळतो. सुनील शहरात नोकरी करत असले तरी गाव, आई-वडील आणि श्री विठ्ठलाची वारी यांच्याशी त्यांची नाळ कायम जोडलेली होती. दरवर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानात ते आवर्जून सहभागी होत असत. परंतु यंदा कामाच्या वाढलेल्या ताणामुळे ते जाऊ शकले नाहीत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, अवघा २५ दिवसांचा मुलगा आणि जुळा भाऊ असा परिवार आहे. घरात बाळाच्या आगमनाचा आनंद अजून ओसरला नव्हता, तोच सुनील यांच्या निधनाने त्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले.

Pune Moshi tragedy – लगीनघरात पसरली शोककळा! 15 दिवसांपूर्वी झाला होता विवाह; नातेवाईकांचा आक्रोश

…काढता पाय घेतला !

‘तुमच्या घरातील कोणी ढिगाऱ्याखाली अडकले असते तर तुम्ही गप्प बसला असतात का?’ असा सवाल नातेवाईकांनी केला. नातेवाईक अधिकच आक्रमक होत असल्याचे पाहून आमदार अमित गोरखे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांनी काढता पाय घेतला.

मृतांच्या नातेवाईकांना ४० लाखांची मदत

मोशी कचरा डेपोत इमारत कोसळून झालेली घटना गंभीर असून, माणुसकीच्या भावनेतून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ४० लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये महापालिका १०, राज्य शासन ५ लाख, तर संबंधित अॅन्थोनी लारा कंपनी २५ लाखांची मदत करणार आहे. पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही कंपनी करणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी शनिवारी दिली. महापौर लांडगे यांनी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. लांडगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ४० लाखांची मदत केली जाणार आहे. तसेच अशी दुर्घटना होऊ नये यासाठी मोशीतील कचरा कमी करण्याचे आदेश दिले असून, शहरात दुसरा प्रकल्प सुरू करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आपण केली आहे. मोशीत काही चुकीच्या घटना घडत असतील तर त्यासाठी समिती नेमावी. पारदर्शक पद्धतीने चौकशी करावी. चौकशीतून जे सत्य बाहेर येईल, त्यानुसार कारवाई करावी, अशी आपण मागणी केल्याचेही महापौर लांडगे म्हणाले.

मोशीवर ताण वाढला; प्रशासनाची कबुली

शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढणारा कचरा लक्षात घेऊन पुनावळे येथील ६१ एकर जागेमध्ये कचरा डेपो उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पुनावळे येथील कचरा डेपोचे आरक्षण रद्द केल्यामुळे मोशी कचरा डेपोवर ताण वाढल्याची महापालिकेच्या प्रशासनाने कबुली दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा मागील ३५ वर्षांपासून मोशीतील ८१ एकर जागेवर कचरा आणून टाकला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे मोठे डोंगर उभे राहिले आहेत. कचरा डेपोची क्षमता संपुष्टात आली असतानाच प्रतिदिन १५७९ टन कचरा टाकला जात आहे. महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन केंद्राचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पुनावळे येथे ६१ एकर जागेवर डेपो उभारण्याचे नियोजन केले होते. याबाबतचा विकास आराखड्यात आरक्षणही मंजूर केले होते. मात्र, पुनावळे येथील कचरा डेपोचे आरक्षण रद्द झाल्याने मोशी कचरा डेपोवर ताण वाढल्याचे महापालिका प्रशासनाने कबूल केले आहे.

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाची मुदत संपली

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशीत उभारलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाची ३० जून २०२६ रोजी मुदत संपल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची दरवर्षी परवानगी घ्यावी लागते. त्या दृष्टीने नव्याने परवानगी मिळावी म्हणून मंडळाकडे अर्ज केल्याचा खुलासा महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केला आहे. महापालिकेच्या वतीने मोशीत उभारलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे उद्घाटन १ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमातून झाले होते. हा प्रकल्प ‘अॅन्थोनी लारा’ कंपनी चालवत आहे. हा प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने ३० जुलै २०२५ रोजी महापालिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. दरम्यान, ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची दरवर्षी परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार मंडळाकडे परवानगीची मुदत संपण्यापूर्वीच अर्ज केला आहे, असे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी म्हटले आहे.