मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनसह सातजणांवर गुन्हा, ठेवीदार महिलेची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहिल्यानगर शहरातील पाइपलाइन रोडवर असलेल्या मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत ठेवींवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून एका महिलेची 7 लाख 27 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संस्थेच्या चेअरमनसहसातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोसायटीचे चेअरमन चंदुलाल बिहाणी (रा. परळी शहर, जि. बीड), त्यांची मुलगी पूजा बिहाणी, कर्मचारी वैभव नावडकर (रा. मिस्तबाग चौक), अर्जुन वाव्हळे (रा. पाइपलाइन रोड), वैशियर रुक्मिणी राजेंद्र साळुंके (रा. तपोवन रोड), मिथुन गांधी (रा. बोरुडे मळा, अहिल्यानगर) व एक लेखनिक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत स्मिता दीपक दिकोंडा (वय 41, रा. अमृतकलश अपार्टमेंट, बोरुडे मळा, सावेडी) यांनी 10 जुलै रोजी फिर्याद दिली आहे.

स्मिता यांचा राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी (वैजनाथ) या संस्थेच्या मोरया मंगल कार्यालय, पाइपलाइन रोड येथील शाखेतील पदाधिकाऱयांनी विश्वास संपादन केला होता. सोसायटीत ठेव ठेवल्यास त्यावर 12.12 टक्के दराने व्याज परतावा देण्याचे आमिष त्यांनी दाखविले होते. यावर विश्वास ठेवून स्मिता यांनी जून 2023 मध्ये संस्थेत 6 लाख रुपये ठेव ठेवली.

मुदत संपल्यानंतरही फिर्यादीला 6 लाख रुपये मुद्दल व त्यावरील 1 लाख 27 हजार रुपये व्याज परत करण्यात आले नाही. जेव्हा त्यांनी पैशांची मागणी केली, तेव्हा आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्मिता दिकोंडा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.