
अतिरिक्त वेळेत ज्युड बेलिंगहॅमने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर इंग्लंडने नॉर्वेचा 2-1 असा पराभव करत फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. नॉर्वेचे खडतर आव्हान मोडून काढत इंग्लंडचा संघ विजेतेपदाच्या शर्यतीत कायम राहिला आहे. इंग्लंडसाठी बेलिंगहॅम पुन्हा एकदा संकटमोचक ठरला असून त्याने सामन्यात दोन महत्त्वाचे गोल केले.
मियामीमध्ये प्रचंड उष्णतेत खेळलेल्या गेलेल्या या लढतीत नॉर्वेने इंग्लंडला सुरुवातीलाच धक्का दिला. अँड्रियास श्जेलडरप याने गोल करत नॉर्वेला आघाडी मिळवून दिली. मात्र, गेल्या सामन्यात मेक्सिकोविरुद्ध दोन गोल करणाऱ्या बेलिंगहॅमने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. मध्यांतराला काही मिनिटं बाकी असताना अँथनी गॉर्डनच्या पासवर बेलिंगहॅमने अत्यंत चपळाईने बॉक्समध्ये प्रवेश केला आणि गोल करत इंग्लंडला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
The Three Lions claim their spot in the Semi-finals 🏴 #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 11, 2026
नॉर्वेचा स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालांड याने गेल्या 14 सामन्यांमध्ये गोल केला होता, मात्र इंग्लंडविरुद्ध त्याची ही मालिका खंडित झाली. हाफ टाईमनंतर नॉर्वेने दुसरा गोल केला होता, परंतु व्हीएआर रिव्ह्यूमध्ये हालांडने इलियट अँडरसनला धक्का दिल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे हा गोल रद्द करण्यात आला. यावरून बराच वादही निर्माण झाला. यानंतर क्रिस्टोफर अजेरचा एक शॉट गोलपोस्टच्या बारला लागल्याने नॉर्वेची विजयाची संधी हुकली.
प्रचंड उष्णता आणि आर्द्रतेमुळे दोन्ही संघांचे खेळाडू पूर्णपणे थकले होते. सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेच्या पहिल्या हाफनंतर थकलेल्या हालांडला मैदानाबाहेर जावे लागले. अतिरिक्त वेळेमध्ये नॉर्वेचा गोलरक्षक ओरजान नायलँड याच्याकडून एक मोठी चूक झाली. मॉर्गन रॉजर्सचा लांबून मारलेला शॉट नायलँडच्या हातातून निसटला आणि बेलिंगहॅमने चेंडू थेट जाळ्यात धाडला. बेलिंगहॅमचा या स्पर्धेतील सहावा गोल ठरला आणि हाच गोल इंग्लंडसाठी विजयी ठरला.
FIFA World Cup 2026 – आमच्यापासून सावध राहा… स्पेनचा स्ट्रायकर यामालचा फ्रान्सला इशारा
एक ऐतिहासिक विक्रम
1966 च्या ऐतिहासिक विश्वचषक फायनलनंतर इंग्लंडला पहिल्यांदा गोल स्वीकारल्यानंतर बाद फेरीचा सामना जिंकता येत नव्हता. मात्र, या विश्वचषकात इंग्लंडने 3 सामन्यांत तब्बल दुसऱ्यांदा पिछाडी भरून काढत विजय मिळवला आहे.


























































