
अवघ्या १५ दिवसांपूर्वी झालेले लग्न… सुखी संसाराची बघितलेली स्वप्ने… एका घटनेने सर्व धुळीला मिळाले. १५ दिवसांपूर्वी आनंदाने भरलेल्या लगीनघरात आज शोककळा पसरली.
महेश सुरेश कुंभार (वय ३३, रा. आदर्शनगर, मोशी) हे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील असून, ते या प्रकल्पामध्ये ‘एचआर’ विभागामध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून कामाला होते. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी २२ जून रोजी कुंभार यांचा गावी विवाह झाला होता. मित्रांसमवेत ते येथे भाडेतत्त्वावर राहत होते.
दरम्यान, कचऱ्याच्या ठिकाणी काम करत असल्यामुळे ही नोकरी सोडून कायमस्वरूपी छत्रपती संभाजीनगरला गावी स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच काळाने घाला घातला. दुर्घटनेच्या दिवशी सुखरूप बचावलेले दादासाहेब आरडे यांनी महेश यांच्या भावाला या घटनेची माहिती दिली.
वामन कसबे यांचा शोध सुरूच
वामन कसबे यांचा अद्यापि शोध लागलेला नाही. त्यांनी बुधवारी कचरा डेपोमध्ये हजेरी लावल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, कसबे यांनी प्रशासकीय इमारतीत प्रवेश केलाच नाही. काहींनी त्यांचा मृतदेह मुख्य इमारतीपासून काही अंतरावरील कचऱ्याखाली गाडला गेल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
कामगार कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली, मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये!
घरी बिर्याणी खाण्यासाठी जायचे टाळले अन्…
‘ आज घरी बिर्याणी बनवली असून, जेवायला घरीच ये,’ असा आग्रह सनीच्या आईने केला. कंपनीजवळच घर असल्याने सनीनेही घरी जायची तयारी केली. मात्र, कंपनीतील सहकाऱ्याने ‘आज माझ्यासोबतच जेव,’ असा आग्रह धरला आणि सनी जेवण्यासाठी थांबला. मात्र, जेवण करत असतानाच नियतीने त्याच्यावर घाला घातला. सनी अशोक माने (वय ३६, रा. गंधर्वनगरी, मोशी) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. कंपनीत वाहनचालक म्हणून काम करणारा सनी हा मूळचा दिघी येथील रहिवासी होता. पत्नी कांचन, दोन लहान मुले आणि आई-वडील असा त्याचा परिवार आहे.
कुटुंबाचा प्रमुख आधार असलेला सनी गेल्याने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्घटनेच्या दिवशी सनी घरी जेवायला जाणार होता. आईने खास त्याच्यासाठी बिर्याणी बनवली होती. मात्र, सहकाऱ्याच्या आग्रहाखातर तो कॅण्टीनमध्येच थांबला. मात्र, हे जेवण त्याच्यासाठी अखेरचेच ठरले. काही क्षणांतच भीषण दुर्घटना घडली आणि सनी कचऱ्याच्या डोंगराखाली अडकला. ‘सनी घरी आला असता तर आज आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले नसते,’ अशी हळहळ व्यक्त करत आईच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. या दुर्घटनेने दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, तर वृद्ध आई-वडिलांनीही आपल्या मुलाला कायमचे गमावले.




























































