लोककलावंतांचे अनुदान दुप्पट होणार; दशावतारी कलाकारांना ओळखपत्र, शिवसेनेच्या मागणीला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणातील दशावतार कलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच दशावतारी कलाकारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून त्यांना ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2 कोटी 22 लाख रुपयांवरून 4 कोटी 40 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. कलाकारांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर बोलताना शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्या मांडल्या. रत्नागिरीत नमन, भजन, भारूड, महिलांच्या टिपऱ्या, शिमग्यातला संकासुर, जाखडी नृत्य, शक्तितुरा आदी लोककला आहेत. त्यांचाही अनुदानामध्ये अंतर्भाव करावा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. दशावतारी कलाकार या कलेसाठी वर्षानुवर्षे खर्ची घालतो. उतारवयात या कलाकारांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे भजनी कलाकार व दशावतारी कलाकारांना सरकारने मानधन द्यावे, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.

या लक्षवेधीला उत्तर देताना सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशीष शेलार यांनी वाढीव अनुदानाची घोषणा केली. ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ या लोककलांचाही अनुदान योजनेत समावेश असेल. दशावतारी कलाकारांसाठी असलेल्या राज्यस्तरीय समितीचा विस्तार करून त्यात देवेंद्र नाईक, दत्तप्रसाद शेणई, संतोष रेडकर, राजाराम धुरी आणि शरद मोचेमाडकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकपरंपरेचा विपर्यास करणाऱ्या ‘देव खेळ’ या वेब सीरिजविरोधात पोलीस कारवाई केली जाईल.

राज्यातील भारूड, संकासुर आणि शक्तितुरा या लोककलांचे महोत्सव राज्यातील प्रत्येक विभागात आयोजित करण्यात येतील.

‘राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजने’त पात्र दशावतार कलाकारांचा समावेश करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांमार्फत कार्यवाही करण्यात येईल.

अनुदानाचा लाभ थेट पोहोचावा, यासाठी वाढीव निधीपैकी निम्मी रक्कम कलाकारांच्या बँक खात्यात तर उर्वरित रक्कम कलापथक चालकांना देण्यात येईल. याचा जीआर 15 दिवसांत काढण्यात येईल.