
मंत्री आणि अधिकाऱयांच्या सभागृहातील अनुपस्थितीचा मुद्दा आज विधानसभेत पुन्हा एकदा गाजला. यापुढे संबंधित मंत्री आणि अधिकारी उपस्थित नसतील तर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले जाईल, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.
विरोधी पक्षाच्या वतीने विधानसभा नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तवावरील चर्चेच्या वेळी सभागृहात मंत्री आणि गॅलरीत अधिकारी उपस्थित नव्हते. याकडे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांचे लक्ष वेधले. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावेळी मंत्री आणि अधिकारी चर्चा ऐकण्यासाठी उपस्थित नसणे हा या सभागृहाचा अवमान आहे. सभागृहात मंत्री आणि गॅलरीत अधिकारी उपस्थित राहणार नसतील तर अधिवेशन रस्त्यावर घ्या, असे वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावत कामकाज तहकूब करण्याची मागणी केली. विरोधक आक्रमक झाल्यावर तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटे तहकूब केले.
तहकुबीनंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी झाल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहात मंत्री आणि अधिकाऱयांच्या अनुपस्थितीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यापुढे असले प्रकार खपवून घेणार नसल्याचे सांगितले.


























































