पंचगंगेत दररोज विनाप्रक्रिया 69.49 दशलक्ष लिटर सांडपाणी! पर्यावरणमंत्र्यांची धक्कादायक कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंचगंगा नदी खोऱ्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून दररोज निर्माण होणाऱया एकूण 214.19 दशलक्ष लिटर घरगुती सांडपाण्यापैकी तब्बल 69.49 दशलक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे, अशी धक्कादायक माहिती पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरात दिली.

कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, भाई जगताप, सुधाकर अडबाले आणि इतर सदस्यांनी पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. औद्योगिक वसाहतींमधील रसायनांमुळे नदीचे पाणी काळे व दुर्गंधीयुक्त झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र मार्च ते मे 2026 दरम्यान औद्योगिक वसाहतींमधून रासायनिक सांडपाणी सोडल्याबाबत कोणतीही तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झालेली नाही, असे सरकारने स्पष्ट केले.

मंत्री मुंडे म्हणाल्या की, कोल्हापूर महापालिका हद्दीतून सद्यस्थितीत दररोज 149.1 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्मिती होत असून त्यापैकी 42.4 दशलक्ष लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत जाते. यावर उपाय म्हणून सध्या 49.5 दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतून दररोज 40 दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते. त्यापैकी 38 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होते, तर दोन दशलक्ष लिटर पाणी थेट नदीत जाते. येथेही भविष्यातील लोकसंख्या विचारात घेऊन 32.5 दशलक्ष लिटर क्षमतेच्या नवीन प्रकल्पाचे काम सुरू आहे.

609 कोटींचा निधी मंजूर

औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलली आहेत. एमआयडीसी क्षेत्राबाहेरील हातकणंगले आणि इचलकरंजी परिसरातील उद्योगांसाठी 609.58 कोटी रुपये खर्चाच्या तीन ‘सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना’ मंजुरी देण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले.