विठुनामाच्या गजरात माउलींच्या पालखीचे प्रस्थान, गांधीवाड्यात विसावला सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - दत्तात्रय आढाळगे

>> अर्जुन मेदनकर

माझे जिवींची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी ।।

पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुर्णी वेधलें ।।

जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया ।।

गळ्यात तुळशीमाळ, हातात भगव्या पताका, हरिनामाचा गजर करीत शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत विठुनामाच्या गजरात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माउलींच्या पालखीने बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास प्रस्थान ठेवले. इंद्रायणीला आलेला पूर लक्षात घेता प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

यंदा मुसळधार पावसामुळे आळंदीतील पुलांचे कठडे महापुरात वाहून गेले. नागरी सेवासुबिधा कोलमडल्या. पिण्याच्या पाण्यापासून निवाऱ्यापर्यंतच्या समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदीत न येता थेट पुण्यात येण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यामुळे मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले.

अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्यापूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास दुपारपर्यंत सोय करण्यात आली होती. श्रींच्या संजीवन समाधी दर्शनास भाविकांनी गर्दी केली.

दरम्यान, नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने महानैवेद्य झाला. मंदिरात सेवेकरी व स्वकाम सेवक यांनी स्वच्छता स्वयंसेवक यांच्या माध्यमातून सेवा रुजू केली. दुपारी दोन ते तीनच्या सुमारास रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांतील मर्यादित वारकऱ्यांना मंदिरातील देऊळवाड्यात प्रवेश देण्यात आला. आळंदी संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना पागोटे वाटप, श्रीगुरू हैबतरावबाबांच्या वतीने दिंडीप्रमुखांना पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते नारळ प्रसाद वाटप झाले. आळंदी ग्रामस्थांनी ‘माउली माउली’ असा जयघोष करीत पालखी खांद्यावर घेत वीणा मंडपातून पंढरीकडे प्रस्थान ठेवले. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी सोहळा आजोळघरालगतच्या गांधीवाड्यात विसावला. गुरुवारी सकाळी पुण्यनगरीकडे पालखी सोहळा मार्गस्थ होईल. परंपरेप्रमाणे धाकटघा पादुकामार्गे पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. यावर्षी इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे पालखीचा पुण्याकडे जाणारा मार्ग बदलण्याचा निर्णय देवस्थानने घेतला होता. मात्र, तो निर्णय बदलण्यात आला आहे.

दरम्यान, दाभाडे सरकार चौक आणि चहोली खुर्द येथील पुलाच्या दोन्ही बाजूचे खड्डे बुजवण्याची मागणी देवस्थानने केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, धर्मादाय सहआयुक्त दिनेश कोथळीकर, आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, प्रांत अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक भीमा नरके, डी. डी. भोसले पाटील, डॉ. राम गावडे पाटील, ऊर्जितसिंह शितोळे सरकार, महादजी शितोळे सरकार, पालखी सोहळाप्रमुख अॅड. राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथसाहेब, पुरुषोत्तम महाराज पाटील, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, रोहिणी पवार, बैल निवड समिती अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, नंदकुमार कुन्हाडे, मच्छिंद्र शेंडे, बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ चोपदार, राहुल चितळकर आदी उपस्थित होते.

ठळक मुद्दे

  • श्रींचे वैभवी दर्शनासह मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट.
  • माउली मंदिरात भक्तिमय उत्साहात नामजयघोष.
  • नगरप्रदक्षिणा मार्गावर दिंड्यांचा हरिनामाचा गजर.
  • अश्वांचे माउली मंदिरात दुपारी सव्वाचार वाजता आगमन.
  • महिलांसह पुरुषांनीही फुगड्या खेळत समानतेचा दिला संदेश.