
सातारा जिह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये महाबळेश्वर, जावळी आणि वाई तालुक्यांतील सात गावांतील 100हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे सहा तालुक्यांतील 83 घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक फटका पाटण तालुक्यातील 39 घरांना बसला आहे.
उशिरा सुरू झालेल्या पावसाने सातारा पश्चिमेकडील तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या 109 टक्के पाऊस झाला आहे. 7 जुलैपर्यंत 288.7 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देतानाच भूस्खलन होणाऱया गावांतील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर केले आहे. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावातील तीन, धावलीतील सहा आणि रुळे येथील दोन, तसेच जावळी तालुक्यातील बहुले गावातील नऊ, बोंडारवाडीतील चार, वाई तालुक्यातील जांभळी गावातील सात, डुईचीवाडीतील चार कुटुंबे अशी 35 कुटुंबे सुरक्षितस्थळी हलवली आहेत. सुमारे 100हून अधिक नागरिकांचे स्थलांतर झाले आहे.
पाटण तालुक्याला मोठा फटका बसला असून, 39 घरांची पडझड झाली आहे. सातारा तालुक्यातील नऊ, खंडाळा तालुक्यातील दोन, जावळीतील 11, वाईतील 13, महाबळेश्वरमधील नऊ अशा 89 घरांचे नुकसान झाले आहे. एकाचा मृत्यू झाला असून, चार जनावरे दगावली आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्तिव्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे यांनी दिली.
काही रस्ते वाहतुकीसाठी बंद
पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने काही रस्ते तात्पुरते बंद केले आहेत. यामध्ये पाबळ नाला धबधब्याकडे जाणारा रस्ता, तारळे-सासपडे-नागठाणे रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. खंडाळा तालुक्यातील मिरजे पूल, पळशी ते वडगाव रस्ता, वाई तालुक्यातील जांभळी-वाशिवली पुलावरील वाहतूक बंद केली आहे. जावळी तालुक्यातील कुडाळ-मेढा रस्ता, सातारा तालुक्यातील मर्डे रस्ता, माजगाव पूल बंद आहे. महाबळेश्वर तालुक्यातील येर्णे बुद्रुक-देवसरे रस्ता बंद असून, बिरामणे ते वाढा पूल वाहतुकीस बंद केला आहे. कास-एकीव-गाळदेव रस्ताही दरड पडल्याने बंद केला आहे. या सर्व मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवली आहे.
१० दिवसांत १०० इंच पाऊस
महाबळेश्वर आणि मुसळधार पाऊस हे समीकरण किती घट्ट आहे, याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून येत आहे. यंदा सुरुवातीला हुलकावणी देणाऱ्या पावसाने जुलै महिना उजाडताच रौद्ररूप धारण केले आहे. अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत पावसाने धुवाँधार ‘बॅटिंग’ करीत तब्बल १०० इंचांचा टप्पा गाठला आहे. गेल्या ९६ तासांत ५४ इंच इतका तुफान पाऊस कोसळला असून, १ जून ते ९ जुलै या काळात सकाळी ८.३० वाजेपर्यंत महाबळेश्वर हवामान खात्याकडे एकूण २४१२ मि. मी. (९४ ते १०० इंच) पावसाची नोंद झाली आहे. या संततधार आणि मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. पावसाचा हाच जोर पुढील काही दिवस कायम राहिल्यास महाबळेश्वरमधील पावसाचे आजवरचे सर्व जुने रेकॉर्ड्स मोडीत निघण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे.




























































