‘गुजरात मॉडेल’ वाहून गेले, सुरतमध्ये 18 इंच पाऊस! 85 वर्षांचा विक्रम मोडला; रस्त्यांवर 5 फूट पाणी साचले, शॉपिंग मॉलचा एक मजला पाण्याखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ एकाच पावसात वाहून गेले! सुरतमध्ये दीड दिवसात तब्बल १८ इंच एवढा अवाढव्य पाऊस कोसळला. १९४१ मध्ये एवढाच पाऊस झाला होता. एकाच पावसाने सुरतची ‘बदसुरत’ केली असून संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आहे. एका शॉपिंग मॉलचा एक मजला बुडाला असून रस्त्यावर चारचाकी वाहने तरंगत आहेत. पुरात अडकलेल्या साडेतीन हजार लोकांना बाहेर काढण्यात आले असून शाळा महाविद्यालये, सरकारी कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे.

‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमान कमी असल्याचे भाकित करणाऱ्या हवामान खात्याचे नाकच धो धो कोसळणाऱ्या पावसाने कापले आहे. मुंबईचे चार दिवसांपासून बेहाल केले आहेत. गुजरातमधील ‘क्लॉथ कॅपिटल’ अर्थात वस्त्रप्रावरणांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतेची पावसाने अक्षरशः बदसुरत केली आहे.

अवघ्या ३६ तासांत सुरतेत तब्बल १८ इंच पाऊस झाला. एवढा पाऊस १९४१ च्या जुलैमध्ये नोंदला गेला होता. या महाकाय पावसामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आहे. रस्त्यावर पाच फुटांपेक्षा जास्त पाणी साचल्याने चारचाकी वाहने तरंगत आहेत. शहरातील एका मोठ्या शॉपिंग मॉलचा एक मजलाही बुडाला असून वीज पडून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

पावसाळ्यातील पहिल्याच पावसाने राजधानी दिल्लीचे बेहाल केले. मुसळधार पावसामुळे दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्ग खचला असून १० किमीपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गुरुग्रामच्या अनेक भागात दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. हवामान खात्याने पावसाची हीच स्थिती कायम राहण्याचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने उद्योगांना पुढील काही दिवस कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याची सूचना केली आहे.

  • केरळातील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता आहेत. या पाच जणांचा युद्धस्तरावर शोध घेण्यात येत आहे.
  • अरुणाचल प्रदेशात २६ जिल्हयांमध्ये मुसळधार पावसाचा लाखो लोकांना फटका बसला आहे. महापुरात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन महिला बेपत्ता आहेत.