
पैसा, संपत्ती आणि सरकारी नोकरीच्या हव्यासापाठी नात्याला काळिमा फासणारी भयंकर घटना राजस्थानमधील जयपूर येथे घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणीने आपल्याच आईचा काटा काढण्यासाठी तब्बल 7 लाख रुपयांची सुपारी दिली आणि अपघात भासवून एका भरधाव स्कोर्पिओ कारने चिरडून आईची हत्या केली. पोलीस तपासामध्ये हे क्रूर हत्याकांड समोर आल्यानतंर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीसह एकूण 7 जणांना अटक केली आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज शर्मा (वय – 45) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या न्यायालयात लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणून कार्यरत होत्या. नीरज यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर मिळणारी सरकारी नोकरी आपल्याला मिळावी, अशी त्यांची मुलगी आयुषी शर्मा (वय – 23) हिची इच्छा होती. मात्र, आईने स्वत: ती नोकरी स्वीकारली. याशिवाय, गेल्या 2 ते 3 वर्षांपासून आई आणि मुलीमध्ये संपत्तीवरूनही मोठा वाद सुरू होता. यातूनच आयुषीने आईला संपवण्याचा कट रचला.
आईचा काटा काढण्यासाठी आयुषीने तिचा मामा मोहन स्वरूप आणि चुलत भाऊ बलराम ऊर्फ रवी यांनाही सोबत घेतले. त्यांनी भरतपूर येथील हेमंत शर्मा नावाच्या व्यक्तीला 7 लाख रुपयांची सुपारी दिली. आरोपींनी नीरज यांच्या हत्येसाठी महिनाभरापासून फिल्डिंग लावली होती. सुरुवातीला त्यांनी भाड्याने घेतलेल्या थार गाडीतून नीरज यांच्यावर पाळत ठेवली. अखेर 3 जुलै रोजी जयपूरच्या प्रताप नगर भागात आरोपींनी डाव साधला. नीरज आपल्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये सोडून परतत असताना 130 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या एका स्कोर्पिओ कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की नीरज हवेत उडून 100 फूट लांब जाऊन पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सुरुवातीला हा केवळ एक रस्ते अपघात वाटत होता. मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा संशय बळावला. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला आणि या संपूर्ण हत्याकांडात पोटच्या मुलीचाच हात असल्याचे समोर आले.
पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी आयुषी शर्मा, मामा मोहन स्वरूप, मोहित शर्मा, आकाश शर्मा, अरविंद शर्मा, हेमंत शर्मा आणि रोहित जाटव यांना अटक केली आहे. तर या कटातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा चुलत भाऊ बलराम ऊर्फ रवी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

























































