
नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये रात्रभर झालेल्या पावसाने बुधवारी गोदावरी आणि नंदिनी नदीला पूर आला. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला सातपूरजवळील पिंपळगाव बहुला येथील पूल वाहून गेला. तपोवनातील सिंहस्थ कामाचे कार्यालयही वाहून गेले. शेकडो कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते पाण्यात आणि खड्ड्यात गेले. यामुळे जलमय झालेल्या अख्ख्या शहरात वाहतूक कोंडी उद्भवली होती. नागरिकांचे अतोनात हाल झाले. सिंहस्थाचा डांगोरा पिटवून सुरू असलेल्या विकासाचा पुरता बोजवारा उडाला. महापालिकेचा दिखाऊपणा चव्हाट्यावर आला.
त्र्यंबकेश्वर, नाशिक परिसरात मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळी दहापर्यंत पाऊस सुरूच होता. गोदावरी, नंदिनी नदीला या हंगामातील पहिला पूर आला आणि नाशिकमध्ये दाणादाण उडाली. सिंहस्थासाठी सातपूरच्या पिंपळगाव बहुला येथे समांतर पूल बांधण्यात आला, तो पाण्यात वाहून गेला. पंचवटी भागातील तपोवनात सिंहस्थ कामांच्या देखरेखीसाठी तात्पुरते कार्यालय तयार करण्यात आले होते, महापालिका प्रशासन व कुंभमेळा प्राधिकरणाच्या गाफीलपणामुळे गोदावरी नदीच्या पुरात हे कार्यालय वाहून गेले.
पावसाळ्यापूर्वी नदी-नाले साफसफाईचा निव्वळ देखावा करण्यात आला. परिणामी, पुराच्या पाण्याला अडथळा निर्माण झाल्याने नंदिनी नदीवरील मिलिंदनगर पुलावरून पाणी गेले, नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पावसाळी चेंबर तुंबल्याने अशोका मार्ग-वडाळा गाव रस्त्याचा संपर्क तुटला होता. सोसायट्यांमध्ये पाणी गेल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागला.
जुने सिडकोतील बडदेनगर, कर्मयोगीनगर येथे रस्ता पाण्याखाली गेला. गोविंदनगर-सिटी सेंटर मॉल सिग्नल चौक भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. गंगापूर रोड, कॉलेज रोड, बेंडकुळे मळा, चोपडा लॉन्स, महापालिका मुख्यालय, मखमलाबाद रस्ता, ड्रिम कॅसलसह ठिकठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. शेकडो कोटी रुपये खर्च केलेले रस्ते खचले, मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वाहने त्यात अडकली होती.


























































