मराठा साम्राज्याचे सरसेनापती मालोजी घोरपडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालोजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. अफाट शौर्य, निस्सीम त्याग, स्वामीनिष्ठा हे गुण ठायी असणारे सेनापती अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक साधनांत घोरपडे घराण्याविषयी माहिती मिळते तेव्हा शौर्य, स्वामीनिष्ठा याची पुन पुन्हा प्रचिती येते. मालोजी घोरपडे हे स्वराज्याचे पाचवे सेनापती होत. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अनेक युद्ध मोहिमांमध्ये मालोजी घोरपडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वाईच्या लढाईत सरनौबत हंबीरराव मोहिते कामी आल्यानंतर 1688 मध्ये त्यांची सरनौबतपदी (सरसेनापती) नियुक्ती झाली. घोरपडे यांचा जन्म कापशी जहागिरीत झाला होता. बाजी घोरपडे हे मालोजी घोरपडय़ांचे सावत्र भाऊ होत. मालोजी घोरपडे यांना संताजी, बहिर्जी आणि मालोजी असे तीन पराक्रमी पुत्र होते. त्यापैकी संताजी घोरपडे पुढे जाऊन मराठा साम्राज्याचे सरनौबत झाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्षणासाठी व स्वराज्यासाठी लढताना 1 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वर / वाफेच्या संघर्षात त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. ‘मातीसाठी मरणारे मराठे असतात.’ हे त्यांच्या शौर्याचे ब्रीदवाक्य मराठा इतिहासात अमर आहे. सरलष्कर मालोजी घोरपडे यांची समाधी संगमेश्वरजवळ कारभाटले गावात आहे.