
>> दुष्यंत पाटील, [email protected]
वरवर पाहता ‘अ कॉटन ऑफिस इन न्यू ऑर्लिन्स.’ हे चित्र म्हणजे फक्त एका कापसाच्या दुकानातलं दृश्य वाटतं, पण एक पाऊल मागे घेऊन विचार केला, तर हे चित्र 19 व्या शतकातली भांडवलशाही, कौटुंबिक नातेसंबंध आणि पराभवाची एक शांत शोकांतिका दाखवतं.
बऱयाचदा एखादं जुनं चित्र म्हणजे फक्त भिंतीवर टांगलेला कॅनव्हास नसतो, तर तो थेट भूतकाळ दाखवणारी एक खिडकी असतो. जेव्हा आपण अशा चित्राकडे बारकाईनं पाहतो, तेव्हा शेकडो वर्षांपूर्वीचा काळ आपल्या डोळ्यांसमोर अगदी जसाच्या तसा उभा राहतो. त्या काळातल्या लोकांचे कपडे, त्यांच्या चेहऱयावरचे हावभाव, त्यांच्या आयुष्यातली सुख-दुःखे, तिथले रस्ते, राजवाडे आणि अगदी सामान्य माणसांचं दैनंदिन जगणंही त्या रंगांमधून बोलायला लागतं. चित्रातल्या एका छोटय़ा ब्रशच्या फटक्यातून आपल्याला त्या काळातल्या आयुष्यातले प्रसंग आजही अनुभवता येतात. पुस्तकात इतिहास वाचताना ज्या घटना फक्त कोरडे शब्द वाटतात, त्याच घटना चित्रामध्ये पाहताना मात्र अगदी सजीव भासतात! भूतकाळ जिवंत करून दाखवणारं असंच एक चित्र म्हणजे ‘अ कॉटन ऑफिस इन न्यू ऑर्लिन्स.’
आपल्याला ‘अ कॉटन ऑफिस इन न्यू ऑर्लिन्स’ हे चित्र समजून घ्यायचं असेल तर चित्रकाराच्या म्हणजे देगाच्या आयुष्यावर एक नजर टाकायला हवी. पॅरिसच्या एका उच्चभ्रू, बँकिंग व्यवसायात असलेल्या खानदानात देगाचा जन्म झाला. त्यानं कायदा शिकावा आणि वकील व्हावं म्हणून त्याच्यावर बराच दबाव टाकला गेला, पण देगानं मात्र आपलं आयुष्य कलेसाठी वाहून घ्यायचं ठरवलेलं होतं. त्यानं घरच्यांचा विरोध पत्करून कलाक्षेत्रात उडी घेतली. देगा हा पॅरिसमधील इतर चित्रकारांसारखा निवांत निसर्गात जाऊन झाडे-डोंगर रंगवणारा नव्हता. त्याला माणसांच्या रोजच्या जगण्यातील हालचाली टिपण्यात विलक्षण रस होता. पॅरिसच्या आापेरा हाऊसमध्ये तालीम करणाऱया बॅले नर्तकी, घोडय़ांच्या शर्यती आणि कॉफी हाऊसमध्ये गप्पा मारणारी सामान्य माणसं हे त्याचे आवडते विषय होते.
1870 च्या दशकात अमेरिकेमध्ये नुकतंच भीषण गृहयुद्ध संपलं होतं. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये कापसाची शेती हा प्रचंड मोठा उद्योग होता. गुलामीवर आधारलेली अर्थव्यवस्था युद्धानंतर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती आणि आता ‘पुनर्रचना काळ’ सुरू झाला होता. त्यातच 1870-71 मध्ये फ्रान्स आणि प्रशिया यांच्यात युद्ध झालं. त्यामुळे पॅरिसमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. या तणावपूर्ण वातावरणातून थोडा विरंगुळा मिळावा आणि आपल्या नातेवाईकांना भेटावं म्हणून देगा ऑक्टोबर 1872 मध्ये अमेरिकेतल्या न्यू ऑर्लिन्स शहरात आला. न्यू ऑर्लिन्स हे त्या वेळी जगातलं कापूस व्यापाराचं एक प्रमुख केंद्र होतं. तिथे देगाच्या आईच्या माहेरचं कुटुंब (म्हणजे ‘मुसॉन’ घराणे) राहायचं. ते लोक (मामाचं कुटुंब) कापसाच्या दलालीचा आणि निर्यातीचा मोठा व्यवसाय करत होते, परंतु आता हे कुटुंब एका प्रचंड आर्थिक संकटाच्या उंबरठय़ावर उभं होतं. जुन्या पद्धतीचे छोटे व्यापारी नवीन सुरू झालेल्या ‘न्यू ऑर्लिन्स कॉटन एक्सचेंज’ आणि जागतिक मंदीच्या लाटेसमोर तग धरू शकत नव्हते. या आर्थिक पडझडीचे, कौटुंबिक तणावाचे आणि अस्थिरतेचे क्षण देगानं कॅनव्हासवर रंगवले.
वरवर पाहता हे चित्र म्हणजे फक्त एका कापसाच्या दुकानातलं दृश्य वाटतं, पण एक पाऊल मागे घेऊन विचार केला, तर हे चित्र 19 व्या शतकातली भांडवलशाही, कौटुंबिक नातेसंबंध आणि पराभवाची एक शांत शोकांतिका दाखवतं.
कला इतिहासकार मिशेल फोआ यांच्या मते, देगानं या चित्रात कापसाचा संपूर्ण जीवन प्रवास दाखवलाय. चित्रात आपल्याला टेबलावर पडलेला कच्चा कापूस दिसतो, त्या कापसावर प्रक्रिया होऊन तयार झालेले माणसांच्या अंगावरील काळे, चकचकीत कोट आणि पांढरे शर्ट दिसतात. तसंच त्या काळात कापसाच्या टाकाऊ भागापासून बनवलेले कागदही या चित्रात दिसतात.
चित्रामध्ये मध्यभागी वर्तमानपत्र वाचताना दिसतोय तो माणूस माणूस म्हणजे देगाचा भाऊ. तो न्यू ऑर्लिन्सचं प्रसिद्ध स्थानिक दैनिक ‘द डेली पिकायून’ वाचतोय. इतिहासकारांच्या मते, याच काळात या वृत्तपत्रात कापूस बाजारातली घसरण आणि दिवाळखोरीच्या बातम्या यायच्या. टेबलावर मामा जीव तोडून कापसाचा दर्जा तपासतायत, पण समोर बसलेला भाचा त्या बाजाराच्या विनाशाची बातमी वाचतोय! हा विरोधाभास एकाच चित्रात टिपणं ही देगाची खरी प्रतिभा आहे. प्रत्यक्ष जीवनात काही वर्षांनंतर मामाची ही कंपनी खरोखरच दिवाळखोरीत निघाली.
त्या खोलीत तब्बल 14 माणसं उपस्थित आहेत, परंतु आश्चर्य म्हणजे संपूर्ण चित्रात कोणीही एकमेकांशी थेट डोळ्यांत डोळे घालून बोलताना दिसत नाही! प्रत्येक जण स्वतच्या कोशात बंदिस्त आहे. कोणी कापसात गुंतले आहे, कोणी वहीत, तर कोणी वर्तमानपत्रात. देगानं एका प्रकारे माणसांमधला ‘तुटले’पणा दाखवलाय.
जेव्हा खरीखुरी कला रोजच्या सामान्य, रटाळ जगण्याला स्पर्श करते, तेव्हा त्यातून किती अफाट सौंदर्य निर्माण होऊ शकतं, याचं हे चित्र एक उत्तम उदाहरण आहे. त्यामुळेच हे चित्र आजही प्रचंड लोकप्रिय आहे.



























































