
कळत-नकळत ज्या हातांकडून गुन्हा घडला आणि त्यामुळे डोंगरी बालगृहात जाण्याची वेळ ओढावली, ते हात सध्या लाडक्या बाप्पाची स्थापना करण्यासाठी आकर्षक देखावा बनवण्यात गुंतले आहेत. गुन्हा केल्यामुळे बालगृहात आलेली ही १५ मुले जात-धर्म न मानता, एकदिलाने अष्टविनायकाचा देखावा बनवण्याच्या लगबगीत असल्याचे चित्र आहे.
गणेशोत्सवाची धामधूम आता सर्वत्र पाहायला मिळत आहे. डोंगरी बालगृह व निरीक्षणगृहातही गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. कोणताही जात-धर्म न मानता १५ मुले बालगृहातील बाप्पासाठी अष्टविनायकाचा देखावा साकारत आहेत. सुतारकाम शिकवणारे शिक्षक सचिन सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ही १५ मुले देखावा बनवत आहेत. या १५ मुलांमध्ये हिंदू आणि मुस्लिम, अशा दोन्ही धर्मांची मुले असून ती एकदिलाने गणेशोत्सवाची तयारी करत आहेत. यामुळे बालगृहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवासाठी मुले स्वतः विविध उपक्रम राबवणार आहेत. पाच दिवस विविध कार्यक्रम होणार असून, त्यात मुलांचा सक्रिय सहभाग असणार आहे. यातूनच मुलांमध्ये सकारात्मकता आणि एकोप्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले.
“दरवर्षीप्रमाणे यंदाही बालगृहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. विशेष म्हणजे १५ मुले हा देखावा तयार करत असून, त्याद्वारे त्यांचे कलागुण सर्वांसमोर येत आहेत. पाच दिवस विविध कार्यक्रम होणार असून यात बालगृहातील सर्व मुले, तसेच कर्मचारी व अधिकारी सहभागी होणार आहेत.”
-
प्रवीण चौधरी (अधीक्षक)
























































