
चेन्नई सुपर किंग्समध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी करण्याची महेंद्रसिंह धोनी इच्छुक असल्याच्या वृत्ताने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले होते. धोनीने फ्रँचायझीमध्ये मालकी हक्क किंवा मोठा हिस्सा खरेदी करण्याबाबत व्यवस्थापनाशी चर्चा केल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. मात्र, ‘धोनीने हिस्सेदारी खरेदी करण्याबाबत फ्रँचायझीशी कधीही चर्चा केली नाही,’ असा खुलासा सीएसकेच्या वरिष्ठ अधिकाऱयाने करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
सीएसकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले की, एम. एस. धोनीने आमच्याशी याबाबत कधीही चर्चा केलेली नाही. या मुद्दय़ावर आमच्यात कोणतीच चर्चा झाली नाही. तसेच त्यांनी एन. श्रीनिवासन यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली असल्याचीही आम्हाला कोणतीही माहिती नाही.
धोनीकडे एक लाखाहून अधिक शेअर्स
धोनीने सीएसकेमध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी कोणतीही अधिकृत चर्चा केली नसली तरी तो फ्रँचायझीचा शेअरहोल्डर आहे. सीएसके ही अनलिस्टेड कंपनी असल्याने तिचे शेअर्स खुल्या बाजारात खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध नाहीत, मात्र धोनीने ऑफ-मार्केट व्यवहाराद्वारे सीएसकेचे शेअर्स खरेदी केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याच्याकडे एक लाखांहून अधिक शेअर्स आहेत. सीएसकेच्या एकूण 30 कोटींपेक्षा अधिक पब्लिक शेअर्सच्या तुलनेत धोनीकडील शेअर्सची संख्या अत्यल्प आहे. श्रीनिवासन कुटुंबाकडे फ्रँचायझीची 55 टक्क्यांहून अधिक नियंत्रक हिस्सेदारी आहे. आयपीएल फ्रँचायझींच्या सध्याच्या मूल्यांकनानुसार धोनीकडील शेअर्सची किंमत सुमारे 2.6 ते 3 कोटी रुपये असल्याचे मानले जात आहे.





























































