शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर कंत्राटदार, प्रशासन ताळय़ावर;बेस्टच्या पोयसर डेपोतील कामगारांच्या पगाराचा प्रश्न सुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमाच्या पोयसर आगारातील कंत्राटी कामगारांच्या पगाराचा प्रश्न शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर शुक्रवारी सुटला. बेस्टमधील पंत्राटदार पीएमआय पंपनीकडून कामगारांना मागील तीन महिन्यांपासून पगार दिला जात नव्हता. या प्रश्नावर कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले. याचवेळी शिवसेनेने बेस्ट समितीच्या बैठकीत आवाज उठवला आणि पंत्राटदारासह बेस्ट प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर ताळ्यावर आलेल्या कंत्राटदाराने कामगारांच्या खात्यात पगाराचे पैसे जमा केले.

संघटनेचे उपाध्यक्ष उमेश सारंग, गणेश शिंदे, नंदू भोसले, भिमराव कोळी, हरेश भोजणे, निलेश सुतार आदींनी खासगी कामगारांच्या पगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. याचदरम्यान कुलाबा येथे पार पडलेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत शिवसेनेचे सदस्य नितीन नांदगावकर, प्रवीणा मोरजकर आणि सुनील अहिर यांनी कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवला होता.